यंदाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक

यंदाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी होईल.या दिवशी मंगळवार आहे. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता..
    अमेरिका आहे कशी?
अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ ३२ कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने १ कोटी चौरस मीटर व सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ५५,००० डाॅलर आहे व देशात ५० राज्ये आहेत. यापैकी ४८ राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय १६ प्रांत असून त्यापैकी  ११ प्रांतात मानवाची वसतीच नाही.
 बडी राज्ये
   कॅलिफोर्नियात १२ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटव्हज (जणू लोकसभा) मध्ये ५३ प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये ८.५ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडात ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. न्यू याॅर्कमध्ये ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. इलिनाॅइस व पेन्सिलव्हॅनियात प्रत्येकी ४ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये प्रत्येकी १८ प्रतिनिधी आहेत.
  इतर ८ राज्यात २१ टक्के  लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज (जणू लोकसभा) मध्ये एकूण ९० प्रतिनिधी आहेत.
उरलेल्या ३६ राज्यात उरलेली लोकसंख्या राहते व त्यांचे हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये उरलेले प्रतिनिधी आहेत.
  प्रतिनिधींची एकूण संख्या ४३५ आहे. थोडक्यात असे की, मोठ्या राज्यात जो बाजी मारेल तोच पक्षांतर्गत निवडणुकीत तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारणार हे उघड आहे. अटीतटीची लढाई झाल्यास गोष्ट वेगळी. हे सर्व आकडे ठोकळमानाचे असून विषय समजून घेण्यासाठी पुरेसे व पुरते आहेत.
गोरे व काळे कुठे व किती? धर्मनिहाय किती?
  अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन लोकांची राज्यनिहाय टक्केवारी मिसिसीपी(३७), ल्युसियाना (३२), जाॅर्जिया(३१), मेरीलॅंड (३०), साऊथ कॅरोलीना(२८), अल्बामा(२६), नाॅर्थ कॅरोलीना(२१), डेलावेअर(२१)व्हर्जिनिया(२०) असून इतर राज्यात ती २० टक्यापेक्षा कमी आहे. हे लोक मतदानाच्या बाबतीत गोऱ्यांपेक्षा अधिक जागरूक असतात.
  देशपातळीचा विचार केला तर अमेरिकेत ७२ टक्के गोरे, १३ टक्के काळे,  ९ टक्के संमिश्र व ५ टक्के एशियन व बाकी इतर आहेत. ख्रिश्चन ७६ टक्के, ख्रिश्चन नसलेले  ४ टक्के,  कोणताही धर्म न मानणारे १५ टक्के,  तर धर्म विषयक माहिती देण्यास नकार देणारे  ५ टक्के लोक आहेत. प्रत्येकात विशेषत: ख्रिश्चनात १०/ १२ पोटभेद आहेत. ०.५ टक्के मुस्लिम, ०.५ टक्के बुद्ध (चिनी व जपानी) आणि हिंदूंसह इतर १.२ टक्के आहेत.
     अमेरिकेत सर्वात जास्त ख्रिश्चन, दुसऱ्या क्रमांकावर ज्युडाइझमला मानणारे (२ टक्के), तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम(०.९ टक्के) व चौथ्या क्रमांकावर हिंदू व बौद्ध (प्रत्येकी ०.७ टक्के ) आहेत. हिंदूंची संख्या गेल्या दहा वर्षात ८५ टक्क्यांनी वाढली असून ७७ टक्के हिंदू पदवीधर आहेत. ३६ टक्के हिंदूंची गणना श्रीमंत व्यक्तींमध्ये ( वार्षिक उत्पन्न एक लक्ष डाॅलर) होते. इतर धर्मीयात हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. हे सर्व मुद्दे निवडणुकीत वेळोवेळी आपला प्रभाव पाडतांना नेहमी दिसतात. यावेळीही दिसतील.
मग, अध्यक्षाची निवड होते तरी कशी?
अमेरिकेत एकूण लहान-मोठी ५० राज्ये (प्रांत) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्टर्स आलेले असतात. या इलेक्टर्सची एकूण संख्या ५३८ असून ज्या उमेदवाराचे २७० इलेक्टर्स निवडून येतील, तो उमेदवार अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून येतो. मग त्याला पॉप्युलर व्होट्समध्ये आघाडी असो वा नसो. इलेक्टर्सची निवड राज्यनिहाय होते. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकन मतदार मतदान करतील. प्रत्येक राज्यात ज्या उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा किंचितही जास्त मते मिळतील, त्याचे सर्वच्या सर्व इलेक्टर्स निवडून आले असे मानले जाईल. या मतांनाच पॉप्युलर व्होट्स असे म्हणतात. यावरून एक मुद्दा लक्षात येतो तो हा की, कोणत्याही राज्यात ९९ टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाल्यास जो परिणाम होईल, तोच परिणाम ५०.१ टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाल्यासही होणार आहे. पॉप्युलर व्होट्सच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी उमेदवारांमध्ये केली जात नाही. या नियमानुसार (विनर टेक्स ऑल) उमेदवारांचे प्रचारतंत्र कसे बदलते ते पाहणे जसे रंजक आहे, तसेच ते ते बोधप्रद व निर्णायकही कसे आहे, ही बाब लवकर लक्षात येत नाही.
विनर टेक्स ऑल- हा मुद्दा आणखी स्पष्ट होण्यासाठी एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. फ्लोरिडा हे अमेरिकेतील महत्त्वाचे राज्य आहे ते या दृष्टीने की निकालाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य ज्या मोजक्या राज्यांमध्ये आहे, त्यात या राज्याचा समावेश होतो. या राज्याच्या वाट्याला २९ इलेक्टर्स आहेत. २००८ व २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाने या राज्यात जवळजवळ ५० टक्यांपेक्षा जास्त मते घेतली होती तर रिपब्लिकन पक्षाने ४९ टक्यांपेक्षा जास्त पण ५० टक्यांपेक्षा अगदी थोडी कमी मते घेतली होती, पण विनर टेक्स ऑल या नियमानुसार डेमोक्रॅट पक्षाचे सर्व म्हणजे २९ इलेक्टर्स निवडून आले होते. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला जेमतेम एक टक्याची बढत मिळाली होती. मतदानाचा कल २०१२ प्रमाणेच राहील हे गृहीत धरल्यास हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा थोडीशीच जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणायचे आहे. म्हणजे केवळ एक टक्का मते आपल्याकडे वळवायची आहेत. अमेरिकन मतदार पक्षनिष्ठ (लॉयल) मतदार मानला जातो. त्यामुळे हा एक टक्का मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला, तसेच हा एक टक्का तसाच कायम ठेवण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाला जिवाचे रान करावे लागणार आहे. अमेरिकेत अशी लहान-मोठी आठ-दहा राज्ये असून त्यांना स्विंग स्टेट्स (निकाल बदलवण्याची क्षमता असलेले राज्य) असे म्हणतात. उरलेली ४० राज्ये या ना त्या पक्षाचे बालेकिल्ले म्हणून मानली जातात. दोन्ही पक्षांचा प्रचाराचा भर स्विंग स्टेट्सवर आणि त्यातील कुंपणावरच्या मतदारांवर (अनडिसायडेड व्होट्स) राहाणार हे उघड आहे. पण राजकीय गणिते इतकी सोपी व बाळबोध नसतात, हेही लक्षात ठेवावयास हवे. एखादा मुद्दा असा असतो त्यामुळे ही अनिश्‍चित मते कुणाकडे झुकतील, ते सांगता येत नाही. चुकीच्या ईमेल्स, क्लिटंन फाउंडेशनला मिळालेल्या देणग्या, अतिरेकी घुसण्याची शक्यता लक्षात घेऊनही मुस्लिम स्थलांतरितांबाबत घ्यायची भूमिका, बेकारी, समलिंगी व्यक्तींबाबतचे धोरण असे बरेच मुद्दे आहेत, त्यापैकी कोणता मुद्दा ऐन मतदानाचे दिवशी भारी पडेल, हे कुणी सांगावे? असेच डोनाल्ड ट्रंप यांचे बाबतीतही म्हणता येईल. ‘आपलीच परिस्थिती डबघाईला आली आहे, ती अगोदर सुधारा. जागतिक राजकारण गेलं चुलीत’, हे प्रचाराचे एक महत्त्वाचे व मतदारांना भावणारे सूत्र डोनाल्ड ट्रंप यांनी पकडले आहे.
स्विंग स्टेट्स- जवळ जवळ चाळीस राज्ये एकतर रिपब्लिकन पक्ष किंवा डेमोक्रॅट पक्ष यांच्याकडे परंपरागत झुकलेली आहे. हा झुकाव ५०.१ टक्के असला काय किंवा ९९ टक्के असला काय, परिणाम तोच आहे. ज्या दहा राज्यात आजवर दोन/चार टक्क्यांच्या फरकाने कुणी ना कुणी आजवर आघाडी घेतली होती, ती राज्ये ८ नोव्हेंबर २०१६ ला काय करतात, हे महत्त्वाचे असून त्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मतदारांवर दोन्ही पक्ष आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. आता सगळ्यांचे पाय वळणार आहेत ओहायओ (१८ इलेक्टोरल व्होट्स), नॉर्थ कॅरोलिना, (१५ इलेक्टोरल व्होट्स), पेनसिल्व्हानिया (२० इलेक्टोरल व्होट्स) या सारख्या मोठ्या स्टेट्सकडे
इलेक्टोरल कॉलेज - यात एकूण ५३८ सदस्य (इलेक्टर्स) असतात. हे अध्यक्षाची निवड करतील. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याच्या प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक त्या राज्यातील सिनेटर्सची संख्या यांच्या बेरजे इतके इलेक्टर्स त्या त्या राज्याला मिळतात.  राज्याच्या वाट्याला येणारी प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार असते पण राज्य कितीही लहान असले तरी त्याच्या वाट्याला एक  प्रतिनिधी (रिप्रेझेंटेटिव्ह) असतोच. असे एकूण ४३५ प्रतिनिधी (रिप्रेझेंटेटिव्हज) चे हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह असते. तर राज्य लहान असो वा मोठे प्रत्येक राज्याच्या वाट्याला दोनच सिनेटर्स मिळतात. असा तो नियम आहे. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या  या सगळ्यात मोठ्या राज्याच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर जवळजवळ एकोणीस लहान राज्यांच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्यायाने ४३५+१००=५३५ ही संख्या येत असताना इलेक्टर्स ५३८ कसे? विशेष कारणास्तव नेब्रास्का व मेन या दोन राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. ज्या उमेदवाराला २७० इलेक्टर्स ८ नोव्हेंबरला निवडून येतील त्या  उमेदवाराला त्यांची २७० मते मिळतील व तो  अध्यक्ष म्हणून निवडून येईल. एका इलेक्टरचे एक मत या हिशोबाने एकूण इलेक्टोरल मते ५३८ होतात व जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल मते ( ५० टक्यापेक्षा निदान एक मत जास्त) आवश्यक राहतील.
विनर टेक्स ऑल- इलेक्टर्स कसे निवडून येतात, हे समजून घेतले पाहिजे. २०१२ मध्ये कॅलिफोर्नियातील सर्वसामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व रॉम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात. मतांच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी होत नाही. या नियमाला विनर टेक्स ऑल असे म्हणून संबोधतात. या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते.
कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स) - अमेरिकेत दोन्ही परंपरागत पक्षांचे बालेकिल्ले म्हणावेत अशी राज्ये आहेत. पण काही राज्ये अशी आहेत की, ज्या राज्यांत दोन्ही पक्षांचे बलाबल जवळपास समसमान असते. निवडणुकीच्या प्रचार मोहीमेद्वारे जो पक्ष ही राज्ये आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतो, तो निवडणूक जिंकतो. म्हणून या राज्यांना  कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स ) असे म्हणतात.
 आजच्या जनमत चाचणीनुसार डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या २१७ इतकी तर रिपब्लिकन पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या १९१ आहे. म्हणजे दोन्ही पक्षांची एकूण हुकमी इलेक्टोरल मते २१७+ १९१ = ३०८ इतकी होतात. याचा अर्थ असा की, १३०   इलेक्टर्स सध्यातरी कुंपणावर आहेत. ते कुणाकडे जातील ते आज सांगता येत नाही. या १३० पैकी डेमोक्रॅट पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ५३ इतकी तर रिपब्लिकन पक्षाला ७९ इतकी इलेक्टोरल मते हवी आहेत. ही १३० इलेक्टोरल मते कलाटणी देऊ शकणाऱ्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मते आहेत. अशी जवळपास दहा राज्ये असून त्यात प्रामुख्याने फ्लोरिडा(२९ मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते), ओहायो (१८ मते), नाॅर्थ करोलिना (१५ मते), व्हर्जिनिया(१३ मते), व्हिस्काॅन्सिन (१० मते) आणि ४ छोटी राज्ये (उरलेली मते) आहेत. या राज्यात सर्वसामान्य मतदारांची ५० टक्यापेक्षा जास्त मते आपल्यायला मिळावीत, यासाठीच पुढचे प्रचार युद्ध असणार आहेत. कारण ज्या पक्षाला पन्नास टक्याच्यावर सर्वसामान्य मते मिळतील, त्या राज्याच्या वाट्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले असे ठरेल.
  प्रत्येक उमेदवार/पक्ष आपल्या इलेक्टर्सची नावे निवडणूक यंत्रणेला आपल्या अर्जासोबतच सादर करीत असतो. मात्र काही राज्यात ही नावे छापतात तर काही राज्यात ती छापतही नाहीत.

Blog - kasa mee?
   यंदा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी होईल.या दिवशी मंगळवार आहे. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता.
   १७९२ मध्ये अमेरिकेत एक कायदा पारित करण्यात आला.ज्या वर्षात निवडणूक होणार त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या बुधवार पासून ३४ दिवसांच्या आत प्रत्येक राज्यात अध्यक्षपदासाठीचे मतदान आटोपलेच पाहिजे, असे ठरविण्यात आले. म्हणजे हा नोव्हेंबर महिना असणार. नोव्हेंबर महिनाच का? याची कारणे दोन आहेत. एक कारण असे की, पिकांची कापणी उरकलेली असते. दुसरे कारण असे की, कडाक्याची थंडी पडायला सुरवात व्हायची असते.
   अठराव्या शतकात दळणवळणाची साधने विकसित झालेली नव्हती. आता आगगाड्या, मोटारी, विमाने आली.पण तेव्हा परस्पर संपर्काची जलद गतीची साधने नव्हती. तसेच आता टेलिफोन, मोबाईल आले त्यामुळे दुसऱ्याच क्षणी एक दुसऱ्याशी संपर्क साधू शकतो . पण आता एक महिन्याहून थोडा मोठा एवढा कालावधी  कशाला हवा?
   १८४५ साली दुसरा एक कायदा पारित करण्यात आला. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या ‘पहिल्या सोमवार नंतरच्या  मंगळवारी’ संपूर्ण देशात अध्यक्षपदासाठी मतदान व्हावे असे ठरले? यामुळे नोव्हेबर महिन्यातील ‘पहिल्या सोमवार नंतरचा  मंगळवार’ व  डिसेंबर महिन्यातील पहिला बुधवार यात ३४ दिवसांपेक्षा जास्त अंतर राहणार नाही, हे नक्की करण्यात आले. ( ‘पहिल्या सोमवार नंतरचा मंगळवार’ असा शब्दप्रयोग का म्हणून ? कारण असे की, एखाद्या वर्षी पहिला मंगळवार नोव्हेंबरच्या  १ तारखेलाही येऊ शकेल. अशावेळी सोमवार आॅक्टोबर महिन्यात नाही का येणार?)पण मंगळवारच का? तर सर्वांना रविवारी चर्चमध्ये जायचे असते. मतदान केंद्र दूर असेल तर प्रवासासाठी सोमवार हाताशी असलेला बरा, म्हणून मंगळवार ठरला. यानुसार निवडणुकीची तारीख केव्हाही २ ते ८ यांच्या दरम्यानचीच असेल(या दोन्ही तारखा पकडून) हेही नक्की झाले.

Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी