हिलरी क्लिंटन यांच्या भात्यातील बाण

हिलरी क्लिंटन यांच्या भात्यातील बाण
वसंत गणेश काणे

   निकोलस बर्नसिस हे हाॅवर्ड विद्यापीठातील एक प्राध्यापक, दोन्ही राजकीय पक्षांच्या कारकीर्दित सेक्रेटरी आॅफ स्टेट( मंत्रीपदावर) राहिलेले, सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील व्हिझिटिंग फेलो असलेले मुरब्बी असून हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्याकडे आपल्या प्रचार मोहिमेची सूत्रे खूप अगोदर पासूनच सोपविली आहेत. तेव्हा डेमोक्रॅट पक्षात पक्षांतर्गत निवडणुका सुरूच होत्या. बर्नी सॅंडर्स या नजीकच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून आता त्या डेमोक्रॅट पक्षाच्या गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) म्हणून निश्चित झाल्या आहेत.जुलैअखेर पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होते की राष्ट्रीय संमेलनात बर्नी सॅंडर्स निवडून येतात, हे पहायचे. सामान्यत: ही औपचारिकता असते. पण राष्ट्रीय संमेलनात प्रतिनिधींना वेगळा निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार असतो. बर्नी सॅंडर्सनी अजून हार मानलेली नाही. हिलरी मात्र आपलीच निवड राष्ट्रीय संमेलनात होणार, हे गृहीत धरून पुढील योजना निश्चित करीत आहेत.  निकोलस बर्नसिस यांचे लेख सध्या प्रसार माध्यमातून जनतेसमोर यायला लागले असून अमेरिकन मतदारांमधील बुद्धिजीवी वर्ग ते उत्सुकतेने वाचत असतो. त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध लेखाचे शीर्षक आहे, ‘ट्रंप यांची नापास झालेली पहिली परीक्षा’.
  ‘ट्रंप यांची नापास झालेली पहिली परीक्षा- अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे जपानमधील अण्वस्त्रग्रस्त हिरोशिमाला भेट देणारे पहिले अध्यक्ष आहेत. ही वार्ता कानावर पडताच आज आपल्या हाती किती प्रचंड आणि प्रलयंकारी शक्ती आहे, याची जाणीव होऊन माणूस अंतर्मुख झाल्यावाचून राहणार नाही, असे म्हणत  निकोलस बर्नसिस आपल्या लेखाची सुरवात करीत आहेत. ७१ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांनी - हॅरी ट्रूमन यांनी - हिरोशिमा शहरावर अणुबाॅंब टाकून ते बेचिराख करण्याचा आदेश दिला होता. पुढे लगेच दुसऱ्या महायुद्धाची इतिश्री झाली आणि तेव्हापासून एकाहूनएक अधिक संहारकारी शस्त्रांचा साठा आपण बाळगून आहोत. तेव्हापासून अनेक अध्यक्षांच्या हाती अण्वस्त्र डागण्याची कळ एकापाठोपाठ एक या क्रमाने येत गेली. पण आपले सुदैव असे की प्रत्येकाने हा कळ दाबण्याचा अधिकार संयमपूर्वक, न्यायोचितपणे, शहाणपणाने आणि आपल्या जीवनमूल्यांना अनुसरून  वापरण्याचे निरपवादपणे टाळले आहे.
  असा कसा हा उमेदवार? - या पार्श्वभूमीवर सध्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रचाराकडे दृष्टिक्षेप टाकला असता काय आढळेल? डोनाल्ड ट्रंप यांची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घोषित होऊ घातलेली उमेदवारी  प्रत्येक विचारी अमेरिकन नागरिकाला धोक्याची व अस्वस्थ करणारी वाटते आहे. सर्वावर कळस हा आहे की, आताआतापर्यंत ट्रंप यांना आपण जमिनीवरून, हवेतून, पाण्याखालून अण्वस्त्रे डागू शकतो, हे देखील पुरतेपण माहित नव्हते. या अण्वस्त्रांचा वापर करण्याचा अंतिम निर्णय अमेरिकेच्या अध्यक्षांचा असणार असल्यामुळे, अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्याने या विषयाकडे अतिशय गंभीरपणे का पाहिले पाहिजे, ते लक्षात येईल. मानवाच्या इतिहासातले हे सर्वात विनाशकारी शस्त्र तंत्रज्ञानानाने विकसित केले आहे. त्यामुळे आपल्या अध्यक्षाच्या कूटनीतिक कौशल्याची परीक्षा यात आहे की त्याने शत्रूला समज देण्यासाठी आणि थोपवण्यासाठीच केवळ यांचा आधार घेऊन त्यांचा शेवटी पराभव केला पाहिजे. प्रत्यक्ष उपयोग करण्याचे त्यांच्या मनातही यावयास नको. या कशाकशाचीही जाणीव, माहिती व शहाणपण ट्रंप यांना आहे, असे त्यांच्या आजपर्यंतच्या वक्तव्यांवरून दिसत नाही.
  मित्रांना वाऱ्यावर सोडणार काय? - अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतीच जपान व दक्षिण कोरिया या देशांना  भेटी  दिल्या आहेत. हे दोन्ही देश अमेरिकेचे संरक्षणविषयक बाबींचा विचार करता अत्यंत जवळचे व विश्वसनीय साथी आहेत. ट्रंप म्हणतात की या दोन्ही देशांनी अमेरिकेला त्यांना मिळत असलेल्या संरक्षणाचा मोबदला म्हणून पुरेशी किंमत चुकवली पाहिजे. हे म्हणतांना ट्रंप यांचे अज्ञानच प्रगट होते आहे. अमेरिकेने या देशांचे सैनिकी संरक्षण काढून घ्यावे, संरक्षण करार संपुष्टात आणावा. त्यांनी स्वत: आपल्यापुरती अण्वस्त्रे तयार करावीत. असे करणे म्हणजे आपल्या विश्वसनीय साथीदारांना वाऱ्यावर सोडून देण्यासारखे आहे. शिवाय दुसरे असे की, असे जर खरोखरच सुरू झाले आणि शस्त्रास्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू झाली तर आशियातील परिस्थिती किती स्फोटक व अस्थिर होईल, याची ट्रंप यांना कल्पना सुद्धा नाही. दुसरा मुद्दा असा की, संरक्षण कवचासाठी हे दोन्ही देश अमेरिकेला पुरेपूर मोबदला देत आहेत.
जिभेवर ताबा हवा - अमेरिकेची संरक्षण नीती डेमोक्रॅट व रिपब्लिकन यांच्या सहमतीने गेली ७० वर्षे अमलात आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधाने जेव्हा अध्यक्षपदासाठीचा उमेदवार करू लागतो तेव्हा अमेरिकेची विश्वसनीयता व तिच्या आश्वासनांचे गांभीर्य यांना तडा गेल्याशिवाय राहील का? परराष्ट्रीय राजकारणात तर एकेक शब्द अगदी तोलून मापून वापरायचा असतो. ट्रंप यांचे शब्दप्रयोग अयोग्यच नाहीत तर भडकावू आहेत.
   वस्तुस्थितीचे ज्ञान नाही - दुसरे असे की, ट्रंप यांची विधाने वस्तुस्थितीलाही सोडून आहेत. दक्षिण कोरिया व जपान यांना जे संरक्षक कवच अमेरिका पुरवते आहे, त्याचा पुरेपूर मोबदला ते देश देत आहेत. जपान हा अमेरिकेचा अत्यंत विश्वासू व भरवशाचा साथीदार आहे. चिनी मनसुबे जर थोपवायचे असतील तर आणि त्याच्या तकदीला वेसण घालायची असेल तर जपानची साथ असलीच पाहिजे. दुसरी विचित्र बाब अशी आहे की, जपान, दक्षिण कोरिया आणि नाटो सदस्य यांचे बाबतीत अनुदार उद्गार काढणारे ट्रंप, अमेरिकेचा जो जुना प्रतिस्पर्धी  रशियाचा पुतिन यांच्या बाबत मात्र प्रशंसापर भाषा वापरत आहेत.
  शत्रू कोण मित्र मित्र कोण हा  विवेक हवा -हे सर्व लक्षात घेतले की, ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी किती अक्षम उमेदवार आहेत, ते जाणवेल. कॅनडा, युरोप आणि आशियातली आपली स्नेही राष्ट्रे रशिया आणि चीन यांच्या विरुद्ध आखायच्या रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत आणि पुढेही बजावणार आहेत. अफगाणिस्थानच्या समस्या हाताळतांना त्यांची मोलाची मदत आपल्याला झालेली आहे, हे विसरून चालणार नाही. असे सख्य रशिया व चीन यामध्येही नाही. रणनीतीमधला एवढा मोठा फायदा ट्रंप यांना का नकोसा होतो आहे?
  अध्यक्षाच्या अंगी कोणते गुण हवेत - आजच्या अण्विक युगात अमेरिकेच्या अध्यक्षाचे अंगी, निर्णयक्षमता, अनुभव, परिपक्वता, सुसंस्कृतपणा हे गुण असणे अतिशय आवश्यक झाले आहे. हिलरी क्लिंटनमध्ये हे गुण पुरेपूर आढळतील तर ट्रंपमध्ये ते अभावानेच दृष्टोपत्तीस येतील. या उलट  ट्रंप हे कज्जेदलालीतील सम्राट समजले जातात. आजवर गेल्या तीस वर्षात लहान मोठ्या अशा मिळून ३५००(साडे तीन हजार) खटल्यात ते गुंतलेले आहेत. यापैकी निदान ७० प्रकरणे त्यांनी उमेदवारी दाखल केल्यापासूनची,एकतर त्यांनी दाखल केलेली किंवा त्यांच्यावर दाखल झालेली, आहेत. हा कुणासाठीही उच्चांकच ठरेल. याबाबतीत आजवरचा अध्यक्षपदाचा कोणताही उमेदवार त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. ट्रंप स्वत:ला कर्मचाऱ्यांचे कैवारी म्हणवतात. पण आपल्यावर अन्याय होतो आहे, पुरेसे वेतन मिळत नाही, अशा तक्रारी त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या असून त्या अर्थाचे दावे न्यायालयात निर्णयासाठी पडून आहेत, यास काय म्हणावे!
   ट्रंप यांचे ‘उद्योग’ - ११ वर्षांपूर्वी त्यांनी ट्रंप वेल्थ इंस्टिट्यूट स्थापन केली पुढे तिचे ट्रंप युनिव्हर्सिटी असे नव्याने बारसे झाले. आज ती ट्रंप एन्टरप्रिनर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते. हे मानांकन(अॅक्रेडिटेड) नसलेले विद्यापीठ असून ते बोगस असल्याबाबतचा दावा प्रलंबित आहे. हे विद्यापीठ पदव्या देत नाही. पण इतर जे विषय शिकविते त्यातील एक विषय ‘नफा कसा कमवावा’ हा असून यासाठी अव्वाच्या दसव्वा शुल्क आकारले जाते, अशी तक्रार आहे.
हा या विषयाबाबतच्या मालिकेतला पहिला लेख असून असाच भरभक्कम मालमसाला असलेले लेख यथावकाश अपेक्षित आहेत.
 भविष्यवाणी - निवडणुकीसंबंधात भारताप्रमाणे इथेही भाकित् वर्तवणारे कमी नाहीत. विन नावाच्या ज्योतिषाची काही भाकिते अशी आहेत. १.हिलरींना डेमोक्रॅट पक्षाची उमेदवारी मिळेल २. सिनेटमध्ये नोव्हेंबर महिन्यात डेमोक्रॅट पक्षाचे बहुमत निर्माण होईल. ३. महत्त्वाच्या मुद्यांबाबतची रिपब्लिकन उमेदवाराच्या अतिरेकी (टोकाच्या) भूमिकांमुळे डेमोक्रॅट पक्षाचा विजय होईल ४. मतदानाचे प्रमाण घटेल. दोन्ही पक्षांचे अनेक मतदार घरी राहणेच पसंत करतील. बघूया, काय काय होते ते.

Comments

Popular posts from this blog

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम