हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी अमेरिकन राजकारणातील महत्त्वाचा टप्पा, पण...
हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी अमेरिकन राजकारणातील महत्त्वाचा टप्पा, पण...
वसंत गणेश काणे
हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी कुणाला आवडो किंवा न आवडो एक गोष्ट नक्की आहे की, ही उमेदवारी अमेरिकन राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. फिलाडेल्फिया येथे त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले ही एक अभूतपूर्व घटना आहे.
थोडा पूर्वेतिहास - खुद्द महिलांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची पदे महिलांना मिळावीत, यासाठी काही कमी प्रयत्न केलेले नाहीत. १९१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर जिनेट रॅनकिन ही महिला पहिल्यांदा मोनटॅना राज्यातून निवडून आली होती. मोनटॅना हे महिलांना मताधिकार मिळावा यासाठीच्या चळवळीतले आघाडीवर असलेले राज्य होते. याच्या तीन वर्षे याअगोदर म्हणजे १९१४ साली महिलांना मतदानाचा अधिकार देणारी १९ वी घटनादुरुस्ती पारित करण्यात आली होती. म्हणजे तरतूद होताच लगेच तीन वर्षांनी महिलांना प्रतिनिधित्त्व मिळाले.
१९४९ साली मार्गारेट स्मिथ ही महिला पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी रिपब्लिकन पक्षाची सदस्य म्हणून नामनिर्देशित झाली व तिने पतीचा सदस्यत्त्वाचा कालावधी पूर्ण केला. पण नंतर ती स्वबळावर निवडून आली. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १९६४ साली तिचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. १९७८ कॅनसॅस राज्यामधून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार काॅंग्रेसवर निवडून आल्या होत्या. निरनिराळ्या खात्यातील पदाधिकारी महिलांचे सध्याचे प्रमाण २५ टक्के आहे. मेयरपदावर १८ टक्के महिला आहेत. राज्यविधीमंडळात २४ टक्के महिला आहेत. सहा महिला गव्हर्नरपदी निवडून आल्या आहेत. सीनेटमध्ये २० टक्के तर हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये १९ टक्के महिला आहेत.
महिला अध्यक्ष कल्पनेतही अमान्य - आजवर अमेरिकेच्या अध्यक्षपदी महिला निवडून आलेली नाही. ही कल्पना हास्यकारकच नव्हे तर हास्यास्पद मानली जात असे. तो विडंबनाचाही विषय असे. महिलांना दुबळ्या, अननुभवी आणि भावनेच्या आहारी जाणाऱ्या मानले जात असे. अटीतटीच्या प्रसंगी त्यांच्यावर भरवसा ठेवता येईल, असे मानले जात नसे. जागतिक घडामोडी हा त्यांच्या समजण्या पलीकडचा विषय मानला जायचा. त्यांचे ज्ञान व बुद्धिमत्ता, अनुभव , सेवा व समर्पण सार्वजनिक क्षेत्रात उपयोगाचे समजले जात नसे. हे सर्व त्या काळात घडत होते की ज्या काळात अमेरिका हा पुढारलेला व प्रागतिक विचारांचा देश मानला जात होता. आफ्रिकन-अमेरिकन, अल्पसंख्यांक, मेक्सिकन ही डेमोक्रॅट पक्षाची व्होट बॅंक मानली जाते. मात्र महिला अध्यक्ष ही कल्पना यांच्याही पचनी पडत नाही. विशेष म्हणजे अशा विचाराच्या महिलाही आहेत. डोनाल्ड ट्रंप हे तर आजचे उमेदवार ना? त्यांनी तर महिलांच्या मासिक पाळीनरून असभ्य टीका केली आहे.
हे सर्व समज बघता हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी हे एक क्रांतीकारी पाऊल मानावयास हवे. पण दुर्दैव असे की, ज्या महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे ती वाद आणि आक्षेपांच्या भोवऱ्यात सापडली आहेत. हे आक्षेपही साधेसुधे नाहीत तर गंभीर स्वरूपाचे आहेत.
पदाचा गैरवापर व हलगर्जीपणा - सनातनी विचाराच्या लोकांचा आक्षेप हा आहे की क्लिंटन फाऊंडेशन ला देणग्या देणाऱ्यांना किंवा द्याव्यात म्हणून हिलरी क्लिंटन यांनी आपल्या सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदाचा गैरवापर केला. अशा व्यक्तींना त्यांनी संवेदनशील क्षेत्रात शिरकाव करू दिला. अशांवर त्यांची खास मर्जी असे. ज्युडिशियल वाॅच नावाच्या एका अपक्ष संस्थेने माहितीचा अधिकार वापरून जी माहिती हस्तगत केली आहे तिला सुद्धा हे आक्षेप अंशत: खरे वाटत आहेत.
क्लिंटन फाऊंडेशन हा मुद्दा या निवडणुकीत शेवटपर्यंत नक्की गाजणार आहे. कारण डोनाल्ड ट्रंप यांनी आपला प्रचार प्रमुख मध्येच बदलला असून तो कडवी टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. देशातील बडेबडे उद्योगपती व परकीय सरकारांकडून पैसे उकळूनच क्लिंटन कुटुंब श्रीमंत झाले आहे, अशा आशयाचा त्याचा लेख सध्या सर्वत्र गाजतो आहे.
ज्युडिशियल वाॅच या संस्थेने माहितीचा अधिकार वापरून ज्या ईमेल्सची माहिती मिळविली आहे, त्यांचे जवळजवळ ८०० पानांचे बाड झाले आहे. ज्यांनी क्लिंटन फाऊंडेशनला देणग्या दिल्या होत्या त्यांची सेक्रेटरी आॅफ स्टेटशी संबंधित कामे लवकर करून दिली जात असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. देणगीदारांवर मर्जी बहाल करून, त्यांनी एकप्रकारे मर्जीची विक्रीच केली असे त्यांचे म्हणणे आहे.
कायदेतज्ञांचे म्हणणे असे आहे की, देणगीदारांची हिलरी क्लिंटन पर्यंत लवकर व खास पोच असे, एवढेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही. असेही अनेक देणगीदार आहेत की जे हिलरी क्लिंटन यांना कधी भेटले सुद्धा नाहीत. भेटीत काय घडले किंवा भेटीनंतर काय आणि काय काय घडले याची मात्र चौकशी व्हायला पाहिजे आहे. ही बाब मात्र अजूनही गुलदस्यातच आहे. चौकशी करण्याची गरज नाही, हा गुन्हा होत नाही, हे अटर्नी जनरलचे मत लोक मान्य करायला तयार नाहीत. खाजगी ईमेल्सचा वापर सोय म्हणून, अनवधानाने की लपवाछपवीचा भाग म्हणून हे हिलरी क्लिंटन यांच्यामचे शुक्लकाष्ठ दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एफबीआयचे चौकशीचे अहवाल, कायदेतज्ञांचे अभिप्राय काहीही म्हणत असले तरी जनमत व उभयपक्षातले( हो, उभयपक्षातले) कार्यकर्ते यांना ही बाब साधी वाटत नाही.
ईमेल्सच्या तपासणीत एक भाग उघड झाला आहे. हिलरी क्लिंटनची भेट मागणाऱ्या एकाला क्लिंटन फाऊंडेशनला देणगी देण्यास भाग पाडल्याचे निदान सत्कृत्दर्शनी तरी दिसते आहे.
दुसरे प्रकरण ब्रिटनच्या फुटबाॅल टीमला व्हिसा मिळण्यात अडचण आली तेव्हाचे आहे. चमूतील काही खेळाडू किरकोळ का असेनात पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले होते. याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे कारण नव्हते, असे आक्षेप घेणाऱ्यांचे मत आहे.
कायदेशीर मत व जनमत - हिलरी क्लिंटन म्हणतात की, सेक्रेटरी आॅफ स्टेट या नात्याने आपण कुणालाही क्लिंटन फाऊंडेशनला देणगी द्या, असे म्हटलेले नाही. किंवा देणगीदाराला अवाजवी सवलती दिल्या नाहीत.तसेच खाजगी ईमेलचा सरकारी कामासाठी वापर हा ‘त्यावेळी’ बेकायदेशीर मानला जात नव्हता. पण तसे मी करायला नको होते, असे मला आज वाटते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारही मर्जी खपा होणे किंवा मर्जी बहाल होणे यापैकी कोणतीही बाब भ्रष्टाचारात मोडत नाही. भरपूर पैसे दिले म्हणजे त्यामुळे कृपा झालीच असणार( क्विड प्रो क्यो- लॅटिन वचन) असेही म्हणता येत नाही. पण कायदेतज्ञांचे मत व जनमत यात फार मोठे अंतर आहे. डोनाल्ड ट्रंप ऐवजी दुसरा कोणताही उमेदवार रिपब्लिकन पक्षाने दिला असता तर हिलरी क्लिंटन नक्कीच पडल्या असत्या असे निरीक्षकांचे मत आहे. एका महिलेला अध्यक्षपदासाठीची उमेदवारी एक प्रमुख राजकीय पक्ष देत असतांना असा वाद उफाळून वर यावा, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असेल?
लिबियातील हत्याकांड - २०१२ मध्ये लिबियामध्ये बेंघाझी येथे अमेरिकेच्या वकिलातीवर इस्लामी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अमेरिकेचा वकील व अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना ठार मारले होते. लिबियन नागरिकांनी या हत्येचा निषेध करीत निदर्शने केली होती. असा हल्ला होणार अशी कल्पना वकिलाने पुरेशी अगोदर देऊनही हिलरी क्लिंटन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. एवढ्यात पुन्हा हा प्रश्न सभागृहात उचलल्यावर हिलरी क्लिंटन यांचे उद्गार होते, ‘ आता काय त्याचे?’ हा प्रश्नही डोनाल्ड ट्रंप उपस्थित करीत आहेत.
हिलरी क्लिंटन यांचे मौनव्रत - डिसेंबर २०१५ नंतर हिलरी क्लिंटन यांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्या पत्रकारांना भेटण्याचेही टाळत आहेत. सध्या प्रचारानिमित प्रवासात त्या समाजातील बड्या, प्रतिष्ठित, धनवंत व ख्यातनाम (सेलिब्रिटी) व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. आपल्या इथल्या सारखा ‘रोड शो’ (प्रचार फेरी) करीत आहेत. कारण एफबीआय ने आणखी १५०० ईमेल्स शोधून काढल्या आहेत. तसेच क्लिंटन फाऊंडेशनबद्दलही रोज लहानमोठी रहस्ये प्रतिपक्षी मंडळी धुंडाळून काढीत आहेत. डोनाल्ड ट्रंप यांचा तोफखाना तर रोज धडाडत असतो. असे असूनही ज्याअर्थी जनमत चाचण्या राष्ट्रपातळीवर हिलरी क्लिंटन यांना थोडीशी बढत दाखवीत असतात. म्हणून हे दोन्ही विषय हळूहळू लोक विसरतील, तोपर्यंत त्यांनी गप्प राहिलेलेच बरे, असे धोरण क्लिंटन यांच्या प्रचारप्रमुखांनी आखलेले दिसते. दरम्यानच्या काळात डोनाल्ड ट्रंप आणखी काही घोडचुका करतील, अशीही आशा ते बाळगून आहेत. पण हे फारफार तर २६ सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर काय? कारण त्या दिवशी दोन उमेदवारांमधील पहिली राष्ट्रीय महाचर्चा आहे. त्या दिवशीच पत्रकार व विरोधी उमेदवाराला तोपर्यंत साठून राहिलेला सर्व दारुगोळा वापरायची संधी मिळेल. हा सर्व धूमधडाका एकाच दिवशी ओढवून घ्यायचा की एकेका दिवशी एकेक विषय हाताळत आरोपातील हवा काढून घ्यायची, यातला पहिला मार्ग हिलरी क्लिंटन यांनी निवडल्याचे सध्याचे चित्र आहे. पत्रकार व प्रतिपक्षी यांना अशाप्रकारे टाळण्या हा डेमोक्रॅट पक्षाच्या इतिहासातला हा पहिलाच प्रसंग असावा.सध्या उत्तरे देण्याचे काम प्रवक्त्यांवर सोपविलेले दिसते.
वाॅशिंगटन पोस्टची पृच्छा - डोनाल्ड ट्रंप वाईट आहे आणि हिलरी क्लिंटन त्याच्यापेक्षा चांगली नाही, असे अमेरिकन जनतेला वाटते आहे, याकडे अंगुलीनिर्देश करणारे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. वाॅशिंगटन पोस्ट नावाच्या एका विख्यात दैनिकाने आपले संपादकीय लेख कोणत्या विषयांवर असावेत, याबाबत वाचकांची मते मागवतांना स्वत:ही काही विषय सुचविले आहेत. यातील पत्रकाराने सुचविलेला पहिला विषय असा आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांतील वादविवादाच्या पाच फैरी दरवेळी आयोजित असतात. किमान १५ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांनाच यात सहभागी होता येत असल्यामुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोनच पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार यात सहभागी होऊ शकतात. ही १५ टक्याची अट काढून टाकावी व तिसऱ्या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारालाही या वादविवादात सहभागी होऊ द्यावे. या विषयाबाबत अमेरिकन जनमताचा कौल काय येतो, ते यथावकाश दिसेलच. पण वाॅशिंगटन पोस्ट सारखे वर्तमानपत्र या विषयावर मते मागवते व हा मुद्दा पहिल्या क्रमांकावर ठेवते, यावर आपण टिप्पणी करण्याची आवश्यकता आहे काय?
Comments
Post a Comment