हिलरी क्लिंटन व्यक्ती व व्यक्तिमत्त्व
हिलरी क्लिंटन व्यक्ती व व्यक्तिमत्त्व
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए(मानसशास्त्र), एम.एड
२७२१ प्राईम रोज रोड नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया, अमेरिका
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
न्यूजर्सी आणि न्यू मेक्सिको येथील प्रायमरीत दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री हिलरी क्लिटंन यांनी आज देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या डेमॉक्रॅटिक पार्टीची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी प्राप्त केली आहे. ही उमेदवारी मिळविणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी क्लिटंन यांना रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांना टक्कर द्यावी लागणार अशीच चिन्हे आता दिसत आहेत. ही लढत चुरसीची होणार असून, यात त्या विजयी झाल्यास व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार्याही त्या पहिल्याच महिला ठरणार आहेत.
अवघे अडुसष्ट वयमान- हिलरी क्लिंटन यांचे आता वय झालेले आहे, हे खरे, पण अमेरिकेत वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या व्यक्ती सुद्धा चांगल्या टुणटुणीत आणि ठणठणीत असतात. ‘अवघे पाउणशे वयमान’, ही ‘कटऑफ लाईन’ अमेरिकेत तरी मानली जात नाही. त्यातून हिलरींचे वय तर ‘जेमतेम’ ६८च आहे. विनोद बाजूला सारून पाहता हिलरी क्लिंटन यांचे आता वय झालेले आहे, असेच म्हणायला हवे, हे खरेच आहे. तसेच वाढलेल्या वयाबरोबर ज्येष्ठांच्या मागे ‘पूर्वकर्मांचा’ ससेमिरा लागतो, हेही मान्य करायला हवे. त्यांची पाटी कोरी नसते. त्यामुळे पूर्वायुष्यात मागे लागलेले लचांडही सोबत पत्करावे लागते. एकूण काय फायदेतोटे अनुभवी व अननुभवी अशा दोघांच्याही वाट्याला असतात.
पहिले असे की, हिलरी क्लिंटन यांची जमीन खरेदीबाबतच्या कथित गैरव्यवहारासाठी न्यायालयासमोर पेशी झाली होती.१९७८ सालचे २२० एकर जमीन खरेदीबाबतचे हे प्रकरण ‘वाॅटरव्हाईट स्कॅंडल’ म्हणून ओळखले जायचे. पण या प्रकरणी हिलरी क्लिंटनवर ठपका मात्र ठेवता आला नव्हता.
दुसरा मुद्दा हा की, २००८ मध्ये अमेरिकेची इराकमध्ये फसलेली मसलत हिलरी क्लिंटन यांची पाठ सोडत नाही. आता २०१६ मध्येही इराण त्यांची पाठ सोडणार नाही. भलेही याबाबतचे अंतिम निर्णय प्रत्यक्षात ओबामा यांनी घेतलेले का असेनात. ‘अंदरकी बात’ आम्हाला माहीत आहे, असे म्हणत प्रतिस्पर्धी त्यांच्यावर वार करणारच.
हार्ड चाॅईसेस-एक कठोर कबुलीजबाब तसेच परखड विश्लेषण - हिलरी क्लिंटन यांच्या ‘हार्ड चॉईसेस’ (कठोर पर्याय) या नावाच्या पुस्तकात इराक व इराण विषयक प्रश्नांचा उहापोह स्वत: हिलरी यांनीच केला आहे. इराकमध्ये अमेरिकन सैन्य पाठवायच्या निर्णयाच्या बाजूने माझे मत होते, हा जसा ओबामा यांचा निर्णय होता, तसाच तो माझाही होता, हे मी नाकारत नाही, असे त्या या पुस्तकात म्हणतात. त्यावेळी माझ्या गाठीला जी माहिती होती, तसेच त्यावेळची जी परिस्थिती होती, तिला अनुसरून माझे हे मत बनले होते, हे नमूद करायला त्या विसरत नाहीत. ‘पण चूक ती चूकच!’, हे म्हणण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याजवळ आहे. पण याला प्रामाणिकपणा म्हणायचे की चतुराई, असा प्रश्न इथे अमेरिकेत विरोधक विचारत आहेत. याचे मूळ अमेरिकन जनमानसाच्या मनोभूमिकेत आहे. अमेरिकन जनमानस उदारमतवादी आहे / असते. ‘आपण चुकलो’, अशी कबुली एखाद्याने दिली की, अमेरिकन लोक त्याला माफ करतात. हिलरी यांचे पती बिल क्लिंटन यांचे त्यांच्या टायपिस्टशी असलेले लफडे त्यांनी सुरवातीला नाकारले पण त्यांचे बिंग फुटले आणि ‘खोटारडा अध्यक्ष’ म्हणून लोक अतिशय खवळले. पण ‘मी खोटे बोललो ही चूक झाली’, असे म्हणून त्यांनी कबुली देऊन माफी मागितली, तेव्हा जनतेने त्यांना माफ केले. पतिराजांचा हा अनुभव हिलरी यांच्या गाठीशी असेलच. ‘इराक बाबतचे आपले मत चुकीचे होते’, अशी कबुली देण्यामागे, असेच काही कारण तर नसेल ना?
टीकाकार म्हणतात‘फेल्ड चॉईसेस’ - राजकारणात ‘उत्तराप्रत्युत्तर’ हा प्रकार नेहमीच पहायला मिळतो. ‘हार्ड चॉईसेस’ (कठोर पर्याय) हे पुस्तक प्रसिद्ध होते न होते तोच रिपब्लिकन पक्षाने दुसरे चोपडे प्रसिद्ध केले. याचे नाव आहे, ‘फेल्ड चॉईसेस’(फसलेले पर्याय)! यात हिलरी कशा चुकीचे आणि खोटे बोलत आहेत, हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षही या चोपड्यातील मजकुराचे खंडन करण्यास चुकला नाही. असे ‘खंडन मंडन’ हा सध्या अमेरिकन राजकीय विश्वाचा एक भागच होऊन बसला आहे.
पापपुण्यात वाटा उचलला- ओबामा यांच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी यांनी त्यांच्या सोबत काम केले आहे. या कार्यकाळात इराक मधली लढाई आटोपली होती. पण लगेच लिबियाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी इराकमध्ये सैनिकी कारवाई करण्याचा अमेरिकेचा निर्णय चुकला होता, हे लक्षात ठेवून (हा निर्णय बुश यांच्या कार्यकाळातला होता ओबामा यांच्या कार्यकाळातला नव्हता) अमेरिकेने सबुरीची भूमिका घेतली. इराक प्रकरणी आम्ही सद्दाम हुसेन या हुकुमशहाचे समूळ उच्चाटन केले हे खरे असले तरी ‘हुकुमशहाला हटवणे सोपे असते पण त्याच्या जागी दुसरा चांगला प्रशासक आणणे सोपे नसते’, हा धडा आम्ही इराक प्रकरणापासून घेतला आहे, हे हिलरी प्रांजळपणे मान्य करतात. हे आटोपते न आटोपते तोच अफगाणिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. आता काय करायचे यावर खल झाला. पण ‘सैन्य पाठवायचे’, असा निर्णय अमेरिकेने घेतला. राजकारणात निर्णय घेताना सरळसोटपणे निर्णय घेऊन चालत नसते. प्रत्येक प्रकरणाचे स्वरूप आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, हा धडा हिलरी यांनी अफगाणिस्तानच्या प्रश्नाच्या निमित्ताने गिरवला आहे. ‘इराणमध्ये मात्र आम्ही वेगळीच चाल खेळलो’, असे हिलरी म्हणतात. ‘तेल खरेदी करणारे इराणचे ग्राहकच आम्ही तोडले आणि त्याला वठणीवर आणले’. असे अभिमानाने सांगत असतानाच त्या पुढे जे म्हणतात ते महत्वाचे आहे. ‘आम्ही इराणचे ग्राहक तोडले पण त्या ग्राहकांना वाऱ्यावर सोडले नाही, तर त्यांना इराकडून तेल मिळेल अशी पर्यायी व्यवस्थाही करून दिली’. आतातर इराणचा प्रश्नही, थोड्याफार कुरबुरी होत का होईना, पण मार्गी लागतो आहे.
परिपक्वतेचा पुरावा - परिपक्वता हा खरेतर अमेरिकेचा स्वभाव नाही. एखादा देश तरला काय किंवा अतिरेक्यांनी गिळला काय, अमेरिकेला त्याचे फारसे सोयरसुतक नसते. आपले हितसंबंध जोपर्यंत अबाधित असतात, तोपर्यंत अमेरिका अशा प्रकरणी हात घालीत नसते. पण हिलरींचे वेगळेपण या पार्श्वभूमीवर उठून दिसते. या गोष्टी बघितल्या म्हणजे आपण एका मुरब्बी राजकारणी व्यक्तीबाबत विचार करीत आहोत, हे लक्षात येते. उद्या जर अमेरिका अधिक परिपक्वपणे वागू लागली तर त्याची सुरवात हिलरी यांनी केली असे म्हणता येईल.
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छ चारित्र्य - हिलरी क्लिंटन यांचे स्वत:चे वैयक्तिक व सार्वजनिक चारित्र्य स्वच्छ आहे. अगदी भारतीय मापदंड लावले तरी चालेल. त्यांचा कायद्याचा गाढा अभ्यास आहे. या तुलनेत बिल क्लिंटन यांचे सगळे ‘रंगढंग’ अजूनही समोर यायचेच आहेत, असे विनोदाने म्हटले जाते. मग या दोघांची जोडी जमली कशी हा एक प्रश्नच आहे. पण ही दोघे विवाहबद्ध झाली खरे. त्यांनी बिल यांना घटस्फोट देण्याचा विचार दोनदा केला होता. पण मग बिल हे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरणार, असे समजल्यावर त्यांनी हा विचार बदलला. पुढे बिल अध्यक्षपदी असतांनाही असा विचार त्यांनी केला होता, असे म्हणतात. पण तोही विचार त्यांनी रहित केला. हे कसे अगदी अस्सल भारतीय पतिव्रतेप्रमाणे ( तेही जुन्या काळच्या!) झाले, असे म्हटले पाहिजे. पण यावरून त्यांच्या उदारमतवादी स्वभावाचा तसेच नीतिमत्तेचा एक वेगळाच पैलू समोर येतो, असे जसे म्हणतात, तसेच भविष्यात अध्यक्षपदाची उमेदवारी वाट्याला यायची असेल तर ही किंमत चुकवायला हवी, हा हिशोबीपणा दाखवणे आवश्यकच होते, असेही म्हणणारे आहेत.
खाजगी व शासकीय कामासाठी वापरायचा ईमेल - खाजगी कामासाठी वापरायचा ईमेल व शासकीय कामासाठी वापरायचा ईमेल याबाबत हिलरी यांची गल्लत झालेली आहे. ‘त्या’वेळच्या नियमानुसार यात गैर असे काहीही झाले नाही, असा हिलरींचा बचावाखातर मांडलेला मुद्दा आहे. पण असे व्हायला नको होते, हेही त्या मान्य करतात. रिपब्लिकन पक्षाचे गृहीत उमेदवार ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) ट्रंप यांनी मात्र या प्रकरणाचा फार मोठा बाऊ केला असून त्यासाठी व अन्य आर्थिक गैरव्यवहारासाठी त्यांना तुरुंगवासाचीच शिक्षा व्हायला पाहिजे, असे म्हणत तोफ डागली आहे.
राजकीयक्षेत्रातील मापदंड- सार्वजनिक जीवनातील हिलरींच्या बाजूचे एक उदाहरण मात्र राजकीयक्षेत्रातील मापदंड ठरावे, असे आहे. गेल्या वेळी हिलरी यांनी ओबामा यांच्या विरुद्ध पक्षांतर्गत अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबतची निवडणूक लढविली होती. त्यावेळी पक्षांतर्गत खुली चर्चा होत असे. या चर्चेत त्या ओबामा यांना दरवेळी चारीमुंड्या चीत करीत असत. पण उमेदवारी ओबामा यांना मिळाली. तेव्हा त्या खुल्या दिलाने त्यांच्या प्रचारात सामील झाल्या एवढेच नव्हे तर पुढे ओबामा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ओबामा यांच्या हाताखाली परराष्ट्र मंत्री म्हणून कामही केले. पण या निर्णयातही त्यांची हिशोबीपणाची दूरदृष्टीच दिसून येत असल्याची टीका झाली होती व आजही होते आहे.
गडगंज संपत्तीचे रहस्य काय?- क्लिंटन दाम्पत्याने गडगंज संपत्ती जमा केली आहे. या मागचे रहस्य जाणून घेण्यासाठी एका टीव्ही वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या प्रतिनिधीने जंगजंग पछाडले. पण व्यर्थ! आम्हाला पैसे मिळवणे आवश्यकच होते. पै पै जमा करून आम्ही ही संपत्ती गोळा केली आहे . त्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले आहेत. ‘लोक सुजाण आहेत, ते योग्यतो निष्कर्ष काढतीलच’, असे म्हणत हा मुद्दा क्लिंटन दांपत्त्याने आटोपता घेतला आहे. ‘हार्ड चॉईसेस या पुस्तकामध्ये बोट ठेवायला एकही जागा चुकूनही राहू नये, अशी काळजी हिलरी यांच्या चमूने घेतलेली दिसते’, अशी टिप्पणी करून एकाने बरेच काही सुचविण्याचा प्रयत्न केला आहे.
क्लिंटन यांची जाहीर भूमिका - अध्यक्षाचे सर्वात महत्त्वाचे काम आहे, अमेरिकन जनतेला सुरक्षित ठेवण्याचे. आक्रमकांचा खंबीरपणे मुकाबला करणे, इसीसच्या रूपाने आक्रमण करण्यास तयार असलेल्या जागतिक दहशतवादाला भूतलावर किंवा जनमानसात स्थान मिळू नये/असू नये, यासाठी दहशतवादाची पाळेमुळे निखंदून काढून अतिरेक्यांचे पुरव्ठ्याचे सर्व मार्ग नष्ट करणे, तसेच अंतर्गत व बाह्य धोक्याशी सामना करण्यासाठी भरभक्कम संरक्षक फळी उभी उभारणे यावर माझा भर असेल.
अमेरिकन मतदारांना पडलेला पेच - क्लिंटन कुटुंबाची विशेषत: बिल क्लिंटन यांची सार्वजनिक क्षेत्रातील कीर्ती वादग्रस्त आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि महिलांना समान वागणूक याचा अमेरिकेत कितीही उदोउदो होत असला तरी पुरुष मतदारांच्या (आणि अनेक स्त्री मतदारांच्या सुद्धा !) पचनी हिलरींची (एका महिलेची)उमेदवारी पडलेली नाही, असा एक अंत:प्रवाह आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबतही टोकाच्या प्रतिक्रिया उमटत असतात. ‘ट्रंप वाईट पण हिलरीही त्यांच्यापेक्षा चांगल्या नाहीत’, असा मतदारांसमोरचा खरा पेच आहे, असे म्हटले जाते. हिलरी यांनी आजवर अनेकदा पाकिस्थानची कड घेतलेली आहे. म्हणून भारतीय वंशाचे मतदार नाइलाजाने उथळ ट्रंप यांना मतदान करतील, असा अंदाज आहे; तर ट्रंप नकोत म्हणूनच केवळ हिलरींना मत देऊ, असे म्हणणारेही अनेक मतदार आहेत. आम्ही यावेळी मतदानाला न जाता घरीच बसून राहू, असे म्हणणारेही काही कमी नाहीत. मतदारांचा हा कल असाच कायम राहिला तर यावेळी मतदानाची टक्केवारी घसरेल, असे भाकीत केले जाते आहे. पण वाॅशिंगटन मधील पोटोमॅक नदीतून बरेच पाणी वाहून जाणे अजून बाकी आहे. शिवाय क्लिंटन व ट्रंप हे दोघेही आजतरी गृहीत उमेदवारच आहेत. दोन्ही पक्षांची राष्ट्रीय अधिवेशने अजून व्हायची आहेत. सामान्यत: यावेळी शिक्कामोर्तब तेवढे व्हायचे बाकी असते तरी यावेळी सर्व प्रतिनिधी मुक्त असतात. बांधिलकी संपलेली असते. त्या लढ्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षातील हिलरींच्या मागे पडलेले नजीकचे उमेदवार बर्नी सॅंडर्स राष्ट्रीय अधिवेशनात अटीतटीची लढाई लढण्याचा मनोदय व्यक्त करीत आहेत. तर रिपब्लिकन धुरीणही ट्रंपपेक्षा बरा असलेला दुसरा एखादा उमेदवार देता येईल का, ही शक्यता पडताळून पाहत आहेत.
या निवडणुकीची एक हलकी फुलकी बाजू - एकट्या रेनाॅल्ड रीगनचा अपवाद वगळला तर आजवरचा अमेरिकेचा एकही अध्यक्ष घटस्फोटित नव्हता. रिपब्लिकन पक्षाचे गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) डोनाल्ड ट्रंप यांचा मात्र दोनदा घटस्फोट झालेला आहे. यापूर्वीचे दोन अध्यक्ष विधूर होते. तर एक अविवाहित( जेम्स बुचनन १५ वे राष्ट्रपती १८५७ ते १८६१) होता. बिल क्लिंटन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा हिलरी ‘फर्स्ट लेडी’ झाल्या. उद्या हिलरी अध्यक्षा झाल्या तर बिल क्लिंटन ‘फर्स्ट जंटलमन’ होणार नाहीत.(कारण ते ‘जंटलमन’ आहेत का? - एक पृच्छा!) त्यांचा उल्लेख प्रेसिडेंट हिलरी क्लिंटन व प्रेसिडेंट बिल क्लिंटन असाच करावा लागेल. अशा कधी गंभीर तर कधी हलक्या फुलक्या चर्चा वृत्तपत्रात व प्रसार माध्यमात सुरू झाल्या आहेत. एकाने तर टिप्पणी केली आहे की, बिल क्लिंटनला ‘जंटलमन’ म्हणणे तरी बरोबर ठरेल का? मग ‘फर्स्ट जंटलमन’ म्हणणे तर दूरच राहिले. बिल क्लिंटन म्हणजे रंगेल गडी. मोनिका व्हिशिंस्की बरोबरचे त्यांचे लफडे उघड झाले, तेव्हा जर हिलरी यांनी घटस्फोट मागितला असता तर जनमताच्या रेट्यामुळे बिल क्लिंटन यांना राजीनामाच द्यावा लागला असता. पण हिलरींनी तसे केले नाही, हा त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा, समजुतदारपणाचा, उदारतेचा भाग मानला जातो. तर अनेक महिलांना तसे वाटत नाही. पुढेमागे आपल्यालाही अध्यक्षपदाची संधी मिळेल या आशेने त्या गप्प राहिल्या, असे त्यांना वाटते. अजून उखाळ्या पाखाळ्यांना खरा ऊत यायचाच आहे. ही नुसती झलक आहे.
Sent from my iPad
Comments
Post a Comment