अमेरिकेत ८ नोव्हेंबरला अनेक पदांसाठी एकाच मतपत्रिकेच्या आधारे निवडणुका
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला अनेक पदांसाठी एकाच मतपत्रिकेच्या आधारे निवडणुका
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
२७२१ प्राईम रोज लेन, नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया, अमेरिका.
दूरध्वनी (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक, हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ४३५ सदस्यांची निवडणूक, सिनेटच्या दर दोन वर्षांनी निवृत्त होणाऱ्या १/३ सदस्यांची(३३/३४ सदस्यांची निवडणूक) इलेक्टोरियल काॅलेजच्या ५३८ सदस्यांची(इलेक्टर्स) निनवडणूक, तसेच राज्यपातळीवरच्या काही सदस्यांची निवडणूक, न्याय/ शिक्षण व/वा तत्सम विभागातील पदांसाठीची निवडणूक, एखाद्या विषयावरील जनमताचा कौल अशा अनेक निवडणुका एकाच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ ला एकाच मतपत्रिकेच्या आधारे होणार आहेत.
असे होणार मतदान - अमेरिकन संसदेची दोन सभागृहे आहेत. एक हाऊस (हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ) व दुसरे सिनेट.
हाऊस (हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज )-हाऊसमध्ये प्रत्येक राज्याला त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व असते. जसे कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य आहे.( जसे आपले उत्तरप्रदेश) त्याला हाऊसमध्ये ५३ प्रतिनिधी असतात. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. १९११ सालची लोकसंख्या गृहीत धरून केलेल्या हिशोबानुसार प्रत्येक राज्याची हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या ठरवण्यात आली असून सध्या हाऊसची सदस्य संख्या ४३५ इतकी आहे.
सिनेट- सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला दोन सिनेटर्स मिळतात. मग ते राज्य लहान असो वा मोठे. अमेरिकेत आजमितीला ५० राज्ये आहेत. त्यामुळे ५० ला दोनने गुणून येणारी संख्या १०० ही सिनेट मधील सिनेटर्सची संख्या असते. अशाप्रकारे जोपर्यंत राज्यांची संख्या ५० आहे तोपर्यंत सिनेटर्सची संख्या १०० व राज्याच्या लोकसंख्येचा विचार करण्यासाठी १९११ सालची त्या त्या राज्याची संख्या हिशोबात घ्यायची हा निकष जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत हाऊसमधील प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या ४३५ कायम राहील.
इलेक्टोरल काॅलेज - यात एकूण ५३८ सदस्य असतात. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याची प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक सिनेटर्सची संख्या असा तो नियम आहे. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर लहानातलहान राज्याच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्याने ४३५+१००=५३५ ही संख्या येत असतांना इलेक्टर्स ५३८ कसे?विशेष कारणास्तव नेब्रास्का व मेन या दोन राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. ५३८ च्या निम्मे म्हणजे २६९. म्हणून ज्या उमेदवाराचे निदान २७० इलेक्टर्स निवडून येतील तो उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
पक्ष इलेक्टर्ससाठी उमेदवार कसे निवडतात?- प्रत्येक राज्याची इलेक्टर्ससाठी उमेदवार निवडण्याची पद्धत वेगळी असते. यांचे नामनिर्देशन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात करतात. पक्षाचे अनुभवी व एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाचे राज्य पदाधिकारी, अध्यक्षीय उमेदवार वा पक्षाशी जवळीक असलेल्या व्यक्ती यातून राज्यनिहाय इलेक्टर्स निवडले जातात. जसे कॅलिफोर्नयातून ५५ उमेदवारांची यादी प्रत्येक पक्ष तयार करील. अध्यक्षीय उमेदवारांच्या नावाखाली यांचा नावे काही राज्यात असतात किंवा काही राज्यात नसतातही.
कुणाचे किती इलेक्टर्स निवडून आले हे कसे ठरते? - हा मुद्दा समजण्यासाठी कॅलिफोर्निया राज्याचे २०१२ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उदाहरण घेऊ. २०१२ मध्ये कॅलिफोर्नियात सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व राॅम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात. या नियमाला ‘विनर टेक्स आॅल’ असे म्हणून संबोधतात.या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते.
एक काल्पनिक उदाहरण - समजा ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप व अन्य उमेदवार ( अमेरिकेत दोनच प्रमुख पक्ष असले तरी इतरही ५/६ उमेदवार असू शकतील) यापैकी कुणाचेच २७० इलेक्टर्स निवडून आले नाहीत, तर काय करायचे? अन्य अशा परिस्थितीत हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हचे ४३५ सदस्य अध्यक्षाची निवड करतील. ८ नोव्हेंबर २०१६ लाच हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ची निवडणूक होते आहे. हे सदस्य अध्यक्षाची व सिनेट उपाध्यक्षाची निवड करील.
असे होण्याची शक्यता यावेळी कितपत आहे? - अजून निवडणुकीला ५ महिने आहेत. पण एका मतचाचणी अहवालाचा विचार करून काही अंदाज बांधता येतील. वाॅशिंगटन पोस्टने २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीविषयी अत्यंत शास्त्रशद्ध पद्धतीने जनमत चाचणी आयोजित केली असून सप्टेंबर २०१५, डिसेंबर २०१५, मार्च २०१६ व जून २०१६ असा दर चार महिन्यात जनमताने घेतलेले हेलकावे स्पष्ट करणारा अहवाल खरेतर मुळातूनच वाचावयास हवा.
जूनअखेरचा जनमत कौल - या अहवालाचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा तर तो असा आहे की, हिलरी क्लिंटन जून अखेरीस बारा टक्क्यांनी पुढे ( ५१-३९=१२) आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये असलेली क्लिंटन यांची केवळ ३ टक्यांची आघाडी डिसेंबर २०१५ मध्ये ६ टक्यावर गेली. मार्च २०१६ मध्ये ती आणखी वाढून ९ टक्यांपर्यंत पोचली मात्र मे२०१६ मध्ये क्लिंटन २ टक्यांनी मागे पडल्या पण लगेच जून २०१६ मध्ये हा फरक त्यांनी भरून काढला व चक्क १२ टक्यांची आघाडी घेतली. मार्च ते मे या काळात क्लिंटन यांची लोकप्रियता एकदम का घसरली ( नोज डाईव्ह) व जून संपतो ना संपतो तोच तिने पुन्हा मुसंडी मारून १२ टक्यांची बढत का घेतली.?
ट्रंप का माघारले?- याला ट्रंप स्वत:च यासाठी जबाबदार आहेत. ट्रंप यांची बेताल व भडकावू वक्तव्ये रिपब्लिकन मतदारांनाही आवडली नाहीत. जज मेक्सिकन असल्यामुळे मेक्सिकन लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत पक्षपती राहू शकेल, ह्या ट्रंप यांच्या वक्तव्यावर तर समीक्षकांनी टीकेची झोड उठवली होती. महिलांबाबतची अनुदार वक्तव्ये, मित्र राष्ट्रे जपान व दक्षिण कोरिया यांनी आपली आपण संरक्षण सज्जता उभी करावी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी येणारा खर्च द्यावा ही त्यांची मागणी, लोकप्रियता कमी करणारी ठरली. ही दोन्ही राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठीचा खर्च वर्षानुवर्षे उचलत आहेत, याचा ट्रंप यांना पत्ताही नाही, याबाबतचे त्यांचे अज्ञान त्याच्या अध्यक्षपदाबाबतच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. एक व्यावसायिक म्हणूनही त्यांती कीर्ती चांगली नाही, याची उदारणे जगजाहीर झाली. ह्या बाबींमुळे त्यांनी स्वत:च आपले नुकसान करून घेतले आहे. राजकारणात काय बोलावे, यापेक्षाही काय बोलू नये, हे महत्त्वाचे असते, हे या बड्या बिल्डरला कळलेच नसावे. यामुळे नोव्हेंबरची अध्यक्षपदाची निवडणूक ट्रंप यांच्याबाबतचा जनमताचा कौल दाखवणारीच ठरण्याची शक्यता वाढली आहे. दर तीन पैकी दोन मतदारांनी ट्रंप अध्यक्षपदासाठी अपात्र आहेत, असे मत नोंदवले आहे.
हिलरींचे देऊळही पाण्यातच आहे - पण इकडे हिलरी क्लिंटन यांनीही सेक्रेटरीपदावर असतांना खाजगी ईमेल व शासकीय कामासाठीची इमेल यात केलेली गल्लत व सरमिसळ मतदारांनी अयोग्य ठरविली आहे. पन्नास टक्के अमेरिकनांना हे दोन्ही उमेदवार अध्यक्षपदाला न्याय देऊ शकतील, असे वाटत नाही. याबाबत एफ बी आय चौकशी करणार आहे. अमेरिकेच्या अटर्नी जनरल लाॅरेटा लिंच व हिलरी क्लिंटन यांचे पती व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन अचानक एकमेकासमोर आले व बिल क्लिंटन व त्यांच्यात नमस्कार चमत्कार झाले. याचा देशभर बाऊ करण्यात आला. ‘सौजन्य म्हणून आम्ही एकमेकांशी बोललो एवढेच’, असा उभयपक्षी केलेला खुलासा अनेकांना मान्य झाला नाही. एफबीआय व अन्य यंत्रणांचे अहवाल जसेच्या तसे मान्य करून मी हिलरींवर गुन्ह्याचा आरोप ठेवायचा की नाही, हे ठरवीन असशी भूमिका आपण घेऊ हे लाॅरेटा लिंच यांनी जाहीर करूनही शंषयाचे ढग काही विरतांना दिसत नाहीत. अशा परिस्थतीत मतदारांना एखादा तिसरा पर्याय मिळाला तर तर तो उमेदवार निवडून येईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण ही द्विपक्षीय राजकीय पद्धतीच्या अंकाच्या शेवटाची सुरवात ठरू शकेल, असा विचार, क्लिंटन व लाॅरेटा यांच्या योगायोगाने झालेल्या भेटीनंतर अनेकांच्या मनात येतो आहे. ट्रंप यांनी तर व्हाईट हाऊस सकट सर्वच प्रशासकीय यंत्रणांवर टीकेची झोड उठविली आहे. अगोदरच अनेकांच्या मनात हिलरी क्लिंटन यांच्याविषयी इतका रोष आहे की, ट्रंप यांच्याबद्दल चांगले मत नसून सुद्धा केवळ हिलरी नको म्हणून ट्रंप यांना मत द्यावे असे त्यांना वाटते आहे. अर्थात असा असंतोष केवळ हिलरींमुळेच आहे असे नाही. त्याला गेल्या आठ वर्षातील डेमोक्रॅट पक्षाची राजवटही कारणीभूत आहे. या काळात डेमोक्रॅट पक्षाचे हाऊस व सिनेट मधील बहुमत संपले आहे. असे असले तरी मे महिन्यात दोन टक्के मतांनी ट्रंप यांनी मिळविलेली आघाडी भरून काढत क्लिंटन यांनी ट्रंप यांना १२ टक्याच्या फरकाने मागे टाकले आहे. पण याचे श्रेय क्लिंटन यांना द्यायचे की ट्रंप यांना या अपश्रेयाचे धनी मानायचे?
अन्य उमेदवारांना लक्षणीय पाठिंबा - लिबर्टेरियन पार्टीच्या गॅरी जाॅनसन यांना ७(सात) टक्के मतदार पाठिंबा देत आहेत तर ग्रीन पार्टीच्या श्रीमती जिल स्टीन यांना ३ (तीन) टक्के मते मिळाली आहेत. या दोन उमेदवारांनी १० टक्के मते घेतली आहेत. म्हणजे १०० उणे १० म्हणजे ९० इतकीच मते या दोन प्रमुख उमेदवारांनामध्ये वाटली गेली आहेत. याचा अर्थ असा की हा ट्रंप व क्लिंटन यांच्या मतांमध्ये पडलेला फरक वा दिसणारी १२ टक्यांची बढत ९० चे दोन भाग होऊन पडलेली आहे. २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत इतर सर्व उमेदवारांना मिळालेली मते जेमतेम २(दोन) टक्के होती. त्यावेळी ९८ टक्के मते रिपब्लिकन वडेमोक्रॅट पक्षात वाटली गेली होती. २०१६ मध्ये गॅरी जाॅनसन व हे जिल स्टीन दोनच उमेदवार एकूण १० टक्के मते घेतांना आणि तेही आजच दिसत आहेत. यात आणखी वाढ झाली तर काय? कोणाच वाट्याला २७० इलेक्टर्स येणार नाहीत. मग हाऊसमधील ४३५ रिप्रेझेंटेटिव्हज अध्यक्ष निवडतील व सिनेटमधील १०० सिनेटर्स उपाध्यक्ष निवडतील. ही बाब या दोन्ही पक्षांना जशी विचार करावयास लावणारी आहे तसेच इतरांना आपले श्वास उत्सुकतेपोटी रोखून धरण्यास कारणीभूत ठरणार आहे.
Comments
Post a Comment