कथा आणि व्यथा अमेरिकेतील दोन राष्ट्रीय संमेलनांच्या!


कथा आणि व्यथा अमेरिकेतील दोन राष्ट्रीय संमेलनांच्या!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिल व्हॅनिया
९४२२८०४४३०    E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
 रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय संमेलन ओहायओ राज्यातील क्लिव्हलंडमध्ये तर डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन पेन्सिलव्हॅनिया राज्यातील फिलाडेल्फिया येथे एकापाठोपाठ जवळपास पंधरा दिवसांच्या अंतराने पार पडली. या संमेलनात ट्रंप यांच्या तृतीय पत्नीने - मेलानियाने - ट्रंप यांच्या समर्थनार्थ तर विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी हिलरी क्लिंटन यांच्या समर्थनार्थ जी भाषणे केली, ती विशेष गाजली.
    आऊटसाईडर ट्रंप - राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारा (बाॅम्बॅस्टिक), भावनावश वृत्तीचा (इंपल्सिव्ह), दिखाऊगिरीत तरबेज असलेला (शोमन) व वक्तृत्त्वाने केवळ सभा गाजवणारा आणि मुख्य म्हणजे सोळा प्रतिस्पर्ध्यांचा खातमा पक्षांतर्गत निवडणुकीत करणाऱ्या ट्रंप यांची जनमानसात असलेली ‘उपरा’ ही प्रतिमा पुसून टाकणे आणि एक खराखुरा (सबस्टॅंटिव्ह) व सहानुभूती बाळगणारा (कंपॅशनेट) अशी त्यांची प्रतिमा पक्षला उभी करायची आहे. खरे तर हा गडी धनदांडगा बिल्डर, खऱ्या खोट्याचे सोयरसुतक नसलेला उद्योगपती, सूक्तासुक्त मार्गांचा अवलंब करणारा चतुर व चलाख व्यावसायिक, राजकारण कशाशी खातात हे माहीत नसल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्यांबाबत अनभिज्ञ, कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता तर सोडाच पण सदस्यही नसलेला पण वृत्तीने मात्र राजकारणी असा ‘आऊटसाईडर’ आहे. त्यांचे रोखठोक वक्तृत्त्व व चाकोरी बाहेरची भूमिका हेच त्यांचे भांडवल आहे, असे त्यांचे समर्थक म्हणतात. पण भाषणात मांडलेल्या मुद्यांमुळे अल्पसंख्यांक (मुस्लिम, मेक्सिकन व स्पॅनिश) तसेच महिला मतदार त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहण्यास तयार नाहीत.
पत्नीने केली पतीची भलावण - (बहुदा) यावर उपाय म्हणून त्यांच्या तृतीय पत्नीने (पूर्वाश्रमीची फॅशन माॅडेल असलेल्या) - मेलानियाने- पतीच्या समर्थनार्थ राष्ट्रीय संमेलनात एक उत्कृष्ट भाषण केले व वाहवा मिळविली. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. एका काकदृष्टी असलेल्या वार्ताहराने हे भाषण म्हणजे बराक ओबामांच्या पत्नीने - मिशेल ओबामाने - काही वर्षांपूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात केलेल्या भाषणाची सहीसही नक्कल आहे, हे सप्रमाण दाखवून रिपब्लिकनांच्या तोंडचे पाणीच पळविले. हे म्हणजे आपल्या केजरी आणि दिग्गूराजांनाही मागे टाकण्यासारखे झाले. त्यामुळे टिंगलटवळीला एकच ऊत आला आहे. इतका की, तोच एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. दुसऱ्या दिवशी रिपब्लिकन पक्षाने हाआरोप चुकीचा आहे, असा खुलासा प्रसिद्ध केला. उत्तरादाखल एका वृत्तपत्राने मिशेल ओबामाचे पूर्वीचे व मेलानिया ट्रंपचे आताचे अशी दोन्ही भाषणे शेजारीशेजारी छापली होती. दोन्ही भाषणाचा आशय सारखाच असला तरी शब्द वेगळे आहेत. शेवटचे वाक्य मात्र तंतोतंत सारखे आहे. यात ५० शब्द आहेत. अमेरिकन निकषानुसार हा चौर्याचा प्रकार मानला जातो.
  अमेरिकन राजकीय विश्लेषक जगातल्या खोचक व खवचट पत्रकांराचे मुकुटमणी शोभावेत, असे आहेत. त्यांना आयतेच खाद्य मिळाले आहे. त्यांच्यासमोर आपले राजदीप, करण किंवा बरखा म्हणजे ‘किस झाडकी पत्ती’, अशी स्थिती आहे. ट्रंप यांच्या पत्नीच्या भाषणाचा हा मुद्दा आता ८ नोव्हेंबरपर्यंत पुन्हापुन्हा उगाळला जावा, असे प्रयत्न डेमोक्रॅट व पत्रकार करणार यात शंका नाही.
ह्यांचं मत तेच माझं मत - ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी) म्हणजेच रिपब्लिकन पार्टीच्या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर डेमोक्रॅटिक मॅशनल पार्टी (डीएनसी) म्हणजेच डेमोक्रॅट पक्षाचे संमेलन उठून दिसले. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे भाषण हे या संमेलनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरावं,असं झालं. हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बराक ओबामा यांनी समाधान व्यक्त केलं तेव्हा 'ह्यांचं मत तेच माझं मत', अशी त्रोटक प्रतिक्रिया होती मिशेल ओबामा यांची. अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांची. पण हे असं सांगून पुरता अर्थबोध होणार नाही. सगळं सुरुवातीपासूनच सांगितलं पाहिजे. हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळाल्याचे निश्‍चित झालं आणि विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी या निर्णयाचं अतिशय उत्साहानं, आनंदानं स्वागत केलं. वृत्तसृष्टीनं या वृत्ताला साजेसं महत्त्वही दिलं. पण अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली की, त्याचं मतही 'ह्यांच्या' मतासारखंच आहे. एखाद्या अस्सल भारतीय पतिव्रतेकडून कौतुकाची थाप मिळावी, असं हे मत आहे.
मिशेल व हिलरी मैत्रिणी - विनोद बाजूला ठेवूया. मिशेल आणि हिलरी या दोघी एकमेकींच्या सध्या (सध्या तरी) चांगल्या मैत्रिणी आहेत. मिशेल यांच्या खास क्लबच्या हिलरीही सदस्या आहेत. हिलरी सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर कार्यरत असताना या दोघी अनेकदा एकाच व्यासपीठावर आढळून आल्या आहेत.
मिशेल पक्षीय राजकारणापासून दूर - पण मिशेल यांची भूमिका प्रामुख्याने अराजकीय स्वरूपाचीच राहिली आहे. बराक ओबामा दोनदा अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मिशेल याही त्यांच्यासाठीच्या प्रचार मोहिमेत सहभागी असत. पण त्यांनी स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले नव्हते. त्या म्हणत , 'राजकारण महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. पण मी राजकारणी नाही. राजकारण हे माझे ध्येय कधीच नव्हते'. घराबाहेर किती वेळ घालवायचा याबद्दलचे त्यांचे नियम कडक आहेत. याबाबत एका निश्‍चित व पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार त्याचे काम सुरू असते/असायचे. त्यांचा प्रचारकायार्चा कार्यक्रम आखणार्‍या चमूला त्यांच्या स्पष्ट व नेमक्या सूचना असत. 'प्रचारासाठी इतका इतका वेळ मी काढून ठेवला आहे. त्यात काय काय करायचे ते तुम्ही ठरवा. तो आटोपला की मला कुणी भेटायचे नाही की अगदी फोनसुद्धा करायचा नाही'. डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात त्या दरवेळी उपस्थित राहत असत एवढीच त्यांची भूमिका. त्यांची भूमिका एखाद्या राजकारण्याची कधीच नसे.
अराजकीय भूमिकेमुळे राजकीय बळ : आश्‍चर्याची गोष्ट ही की त्यांच्या या भूमिके व वृत्तीमुळेच त्यांना भरपूर राजकीय बळ मिळाले आहे. याचा प्रत्यय फिलाडेल्फिया येथील डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनप्रसंगी, त्यांनी हिलरींना पाठिंबा देणारे जे भाषण केले, त्या निमित्ताने आला. २६ जुलैची सकाळ. मिशेल यांनी भाषणाला प्रारंभ केला आणि काही क्षणातच त्यांनी सभागृहाचा ताबा घेतला. सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन एकचित्ताने त्यांचे भाषण ऐकत होते. प्रतिसाद देत होते.
१. आठ वर्षांपूर्वी हिलरींना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा त्या रागावल्या नाहीत किंवा निराश झाल्या नाहीत. गाशा गुंडाळून त्या घरीही गेल्या नाहीत. कारण एक सार्वजनिक कार्यकर्ता या नात्याने व्यक्तिगत निराशेपेक्षा कितीतरी काम आपल्या पुढयात आहे, याची त्यांना जाणीव होती.
२. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी त्यांनी पाठ फिरवलेली नाही. प्रत्येक प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिलं आहे.
३. आपले प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रंप यांच्याजवळ रोजगार देण्यासाठीच्या कोणत्याही योजना नाहीत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाहीत की ज्येष्ठ नागरिकांसाठीही नाहीत. त्यांच्या सर्व योजना त्यांच्यासारख्या श्रीमंतांसाठीच आहेत.
४. हिलरींचा स्वभाव असा आहे की, त्या प्रतिकूलतेसमोर कधीही झुकत नाहीत, की तडजोड करीत नाहीत.
५. केवळ हिलरींमुळे आता माझ्या मुलींची आणि तुमच्या माझ्या सर्वांच्याच मुलामुलींची ही खात्री झाली आहे की, एक महिला अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकते.
६. पुढील चार /आठ वर्षात आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची क्षमता कोणात असेल, हे या निवडणुकीने ठरणार आहे.
७. जेव्हा एखादा क्रूरपणाने किंवा अडदांडपणाने वागतो, बोलतो, तेव्हा तुम्ही त्या पातळीला जायचे नसते. कधीच नाही. ते जेवढे खालच्या पातळीवर उतरतील, तेवढाच आपण आपला स्तर उंच ठेवायचा असतो, हे आपले बोधवाक्य आहे.
८. आपल्या मुलांचे भवितव्य कुणाच्या हाती सोपवायचे हेच या आणि प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचे असते. ही जबाबदारी विश्‍वासाने ज्या व्यक्तीवर सोपवावी , अशी माझ्या मते एकच व्यक्ती आहे. तीच व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहे आणि ती व्यक्ती आहे आपली मैत्रीण हिलरी क्लिंटन.
९. आपल्या जबाबदारीकडे गंभीरपणाने पाहील अशीच व्यक्ती मला माझ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी अध्यक्षपदी हवी आहे. अध्यक्षाला हाताळावे लागणारे विषय काळे किंवा पांढरे असे ठोकळ स्वरूपाचे नसतात. ते मोजक्या शब्दात मांडता येत नाहीत.
१0. हा देश श्रेष्ठ नाही, काहीतरी करून आपल्याला त्याला श्रेष्ठत्त्व प्राप्त करून द्यायचे आहे असे कुणी म्हणत असेल तर त्याचे ऐकू नका. कारण अगदी या क्षणीसुद्धा हा देश या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ देश आहे.
भाषणाची परिणामकारकता : मिशेल ओबामा यांचे हे भावपूर्ण वक्तव्य ऐकत असताना श्रोत्यांच्या मनात वेगवेगळे तरंग उठत होते. साशा आणि मालियाची माता या नात्याने त्या बोलत असताना श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तर नामनिर्देश न करता त्या जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांना धारेवर धरत होत्या तेव्हा श्रोते  त्यांच्या चपखल शब्दयोजनेला मनापासून दाद देत होते. अजूनही ज्या मतदारांची मते संदिग्ध असतील त्यांची मते अनुकूल करण्याचे सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात आहे, असा विश्‍वास संमेलनात उपस्थित असलेले प्रतिनिधी व्यक्त करताना दिसत होते. पक्षात एकवाक्यता निर्माण करण्याचे सकारात्मक सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात होते, अशा शब्दात वार्तांकन करणार्‍यांनी मिशेल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
हेडलाईन बदलली : एका वृत्तपत्रातील संपादकीय कक्षातील घडामोडी रंजक व बोधप्रद ठराव्यात, अशा आहेत. वार्ताहराने संपादकीय कक्षाकडे मिशेल यांच्या भाषणाअगोदर ट्विट केले होते की, प्रथम पृष्ठावरील हेडलाईन 'बर्नी सँडर्स व हिलरी यातील बेबनावाशी, संबंधित असेल. तीन तासांनी त्याने पुन्हा ट्विट केले, 'हेडलाईन बदलावी लागणार!' 'ही सभा मिशेल यांनी जिंकली'. नंतरचे ट्विट होते, २0२0 च्या डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार असणार मिशेल ओबामा! सभागृहातील सर्वांच्या तोंडचा मुद्दा. २0२0 साली काय व्हायचे होईल. पण निदान या निवडणुकीत तरी हिलरींसाठी मिशेल यांचे हे भाषण नवसंजीवनी स्वरुपाचे ठरणार हे मात्र नक्की.
अनपेक्षित अडचण - याशिवाय ट्रंपसाठी अडचणीचा आणखी एक मुद्दा असा की, रिपब्लिकन पक्षाच्या अनेक दिग्गजांनी संमेलनाला दांडी मारली. दोन माजी अध्यक्ष व अध्यक्षपदाचेच पण पराभूत झालेले दोन माजी उमेदवार हे संमेलनात दिसले नाहीत. कुणी फिशिंगला गेले आहेत, कुणी अंगणातील गवत कापत (लॅंड मोविंग) आहेत, तर कुणी ग्रॅंड कॅनियनला पदयात्रा (ट्रेकिंग) काढणार आहेत, याचवेळी सिनेट व हाऊसच्याही निवडणुका आहेत. त्यासाठीचे उमेदवार एकट्यानेच स्वतंत्र प्रचार करीत आहेत, काही मतदारांशी संपर्क दौरा आयोजित करीत आहेत. याच काळात एक महिला उमेदवार अलास्काला ४०००(चार हजार) मैल दूर विमानातून प्रचार करीत आहे. एक ना दोन. हजार कारणे पुढे येत आहेत. अशी पक्षांतर्गत स्थिती आहे. ती चांगली म्हणता यायची नाही.
 नेता अनकूल झाला, अनुयायी होतील का? - इकडे बर्नी सँडर्स यांचा हिलरींना असलेला कडवा विरोध आता मावळला आहे. हिलरी क्लिंटन यांच्यावर त्यांनी स्तुतीसुमने उधळली. पण बर्नी सँडर्स यांच्या अनुयायांना आपल्या नेत्याची ही माघार आवडली नाही. त्यांनी यू टर्न करून हिलरी क्लिंटन यांना दिलेला पाठिंबा त्यांना मानवला नाही. त्यांनी विरोधाच्या घोषणा दिल्या. डेमोक्रॅट पक्षातील तरूणवर्ग बर्नी सँडर्स यांच्याकडे आशेने पहात होता. त्यांची पार निराशा झाली.
ट्रंप व पेन्स यांचे टिकेट (दुक्कल) -  डोनाल्ड  ट्रंप यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार निवडतांना, त्याची निवड जाहीर करतांना व त्याच्या निवडीमागचे (राज) कारण सांगतांना आपल्या स्वभावाला साजेसेच वर्तन केले. इंडियानाचे गव्हर्नर माईक पेन्स यांची निवड न्यूयाॅर्क येथे त्यांनी साधेपणाने जाहीर केली. एरवी ही एक ‘इव्हेंट’ असते. पण प्रकाशझोत आपल्यावरच राहील, याची पुरेपूर काळजी ट्रंप यांनी घेतली. या निमित्ताने केलेल्या भाषणाचा प्रमुख भाग स्वत:ची स्तुती व थोरवी सांगण्यात खर्च करून आपल्या भूमिकेचा अंदाज घेणे/येणे कसे अशक्य आहे हे वार्तांकन करणाऱ्यांना जाणवून दिले. ‘माईक पेन्स यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक बाबतीतच अलौकिक आहे’, हे सांगतांना यांच्या निवडीमागे पक्षात एकोपा निर्माण व्हावा म्हणून ही निवड माझ्यासारख्या ‘उपऱ्याने’ (पक्ष कार्यकर्ता नसणाऱ्याने) करणे आवश्यकच होते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. महिला, अल्पसंख्यांक व समलिंगी यात ट्रंप यांची प्रतिमा मुळीच चांगली नाही. त्यातून गर्भपात, कुटुंब नियोजन, समलिंगीचे प्रश्न व स्थलांतरितांचे प्रश्न याबाबत माईक पेन्स हे तर पराकोटीचे उजवे व सनातनी विचारांचे समजले जातात. इंग्रजीचा अवास्तव पुरस्कार (अमेरिकेत स्पॅनिश बोलणाऱ्यांची संख्या बरीच आहे) हाही अडचण निर्माण करणारा मुद्दा आहे. पण सनातनी विचारांच्या मतदारांना माईक पेन्स यांची उमेदवारी आवडेलही. तीनदा बाशिंग बांधणारा उतावळा, म्हणून ट्रंप यांची संभावना होत असते. म्हणूनच बहुदा सुसंस्कृत जनमानसाच्या त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नसाव्यात/नाहीत. अशीही ट्रंप व पेन्स यांची दुक्कल पाहून हिलरी क्लिंटन व त्यांचे समर्थक यांना हर्षाच्या उकळ्या फुटत आहेत. अमेरिकन महिलावर्ग ही दुक्कल साफ नाकारील, असे त्यांना वाटते आहे. ७७ टक्के महिलांनी ट्रंप यांचे बाबत आपले प्रतिकूल मत नोंदविलेही आहे.
क्लिंटन- केन यांचे टिकेट (जोडगोळी) : हिलरी क्लिंटन यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार अशीच पूरक स्वरुपाची काळजी घेत निवडला आहे. व्हर्जिनियाच्या टिम केन या ५८ वर्षाच्या तरूण पण अनुभवी, अभ्यासू पण धडाडीच्या, स्पॅनिश भाषेत अस्खलित बोलू शकणार्‍या ( स्पॅनिश भाषा बोलणारे बरेच मतदार आहेत) व गर्भपात विरोधी मत असलेल्या (अमेरिकेत गर्भपाताला विरोध करणारे अनेक सनातनी विचारांचे मतदार आहेत.) एका चतुर साथीदाराची निवड केली आहे. प्रतिपक्षाचे हल्ले परतवून लावण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षपदाच्या साथीदाराची असते. हे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता टिम केन यांच्यात आहे. अशा जोडीदाराची गरज हिलरी क्लिंटन यांना पदोपदी भासणार आहे.
ही निवडणूक व्यंगचित्रकार व टिंगल करणारे चुटके लिहिणाऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. एका व्यंगचित्रकाराने ट्रंप हा बालकथा सांगणारा दाखवला आहे. यातला जादुगार ट्रंप म्हणतो आहे, मी काहीही करू शकतो अगदी गवताचे सोनेसुद्धा! ट्रंप यांच्या बढाईखोरपणामुळे  ही टिप्पणी लोकप्रिय झालेली दिसते आहे.
  अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी आपापल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडगोळीची (टिकेट) निवड करीत, निवडणुकीच्या रणांगणात पदार्पण करून पुढील तीन महिन्यातील रणधुमाळीतील पहिले पाऊल टाकले आहे.



Comments

Popular posts from this blog

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम