अमेरिकन निवडणुकीचे वेगळेपण ३.७.२०१६

अमेरिकन निवडणुकीचे वेगळेपण  ३.७.२०१६
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला आपल्या सव्वीस वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी जागतिक कीर्ती मिळवून देणारा बेंजामिन ब्रॅडली हा वयाच्या ९३ व्या वर्षी २१ ऑक्टोबर २0१४ ला निधन पावला. पण या थोर पत्रकाराचे वैशिट्य असे की त्याच्या पश्‍चात हे वृत्तपत्र त्याच जिद्दीने व त्याच प्रथा व परंपरा राखत प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. बेंजामिन ब्रॅडलीचा उत्तराधिकारी म्हणतो, तसा १९९१ मध्ये निवृत्त झाला असला तरी आजही तो आमच्या सोबत न्यूज रूम मध्ये आमची सोबत करीत आहे, असे आम्हाला सतत जाणवत असते, आता अगदी परलोकवासी झाला असला तरी.
वॉशिंगटन पोस्टने २0१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीविषयी अत्यंत शास्त्रशद्ध पद्धतीने जनमत चाचणी आयोजित केली असून सप्टेंबर २0१५, डिसेंबर २0१५, मार्च २0१६ व जून २0१६ असा दर चार महिन्यात जनमताने घेतलेले हेलकावे स्पष्ट करणारा अहवाल खरेतर मुळातूनच वाचावयास हवा.
या सर्वेक्षणअहवालाचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा तर तो असा आहे की, हिलरी क्लिंटन जून अखेरीस बारा टक्क्यांनी पुढे ( ५१-३९=१२) आहेत. सप्टेंबर २0१५ मध्ये असलेली क्लिंटन यांची केवळ ३ टक्यांची आघाडी डिसेंबर २0१५ मध्ये ६ टक्यावर गेली. मार्च २0१६ मध्ये ती आणखी वाढून ९ टक्यांपयर्ंत पोचली मात्र मे२0१६ मध्ये क्लिंटन २ टक्यांनी मागे पडल्या. पण लगेच जून २0१६ मध्ये हा फरक त्यांनी भरून काढला व चक्क १२ टक्यांची आघाडी घेतली. मार्च ते मे या काळात क्लिंटन यांची लोकप्रियता एकदम का घसरली ( नोज डाईव्ह) व जून संपतो ना संपतो तोच तिने पुन्हा मुसंडी मारून १२ टक्यांची बढत का घेतली.?
ट्रंप का माघारले?- याला ट्रंप स्वत:च यासाठी जबाबदार आहेत. ट्रंप यांची बेताल व प्रक्षोभक वक्तव्ये रिपब्लिकन मतदारांनाही आवडलेली नाहीत. जज्ज मेक्सिकन असल्यामुळे मेक्सिकन लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत पक्षपती राहू शकेल, ह्या ट्रंप यांच्या वक्तव्यावर तर समीक्षकांनी टीकेची झोड उठवली होती. महिलांबाबतची अनुदार वक्तव्ये, मित्र राष्ट्रे जपान व दक्षिण कोरिया यांनी आपली आपण संरक्षण सज्जता उभी करावी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी येणारा खर्च द्यावा ही त्यांची मागणी, लोकप्रियता कमी करणारी ठरली. ही दोन्ही राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठीचा खर्च वषार्नुवर्षे उचलत आहेत, याचा ट्रंप यांना पत्ताही नाही, याबाबतचे त्यांचे अज्ञान त्याच्या अध्यक्षपदाबाबतच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. एक व्यावसायिक म्हणूनही त्यांती कीर्ती चांगली नाही, याची उदारणे जगजाहीर झाली. या बाबींमुळे त्यांनी स्वत:च आपले नुकसान करून घेतले आहे. राजकारणात काय बोलावे, यापेक्षाही काय बोलू नये, हे महत्त्वाचे असते, हे या बड्या बिल्डरला कळलेच नसावे. यामुळे नोव्हेंबरची अध्यक्षपदाची निवडणूक ट्रंप यांच्याबाबतचा जनमताचा कौल दाखवणारीच ठरण्याची शक्यता वाढली आहे. दर तीनपैकी दोन मतदारांनी ट्रंप अध्यक्षपदासाठी अपात्र आहेत, असे मत नोंदवले आहे.
हिलरींबद्दलही नाराजी - पण इकडे हिलरी क्लिंटन यांनीही सेक्रेटरीपदावर असताना खाजगी ईमेल व शासकीय कामासाठीची इमेल यात केलेली गल्लत व सरमिसळ मतदारांनी अयोग्य ठरविली आहे. पन्नास टक्के अमेरिकनांना हे दोन्ही उमेदवार अध्यक्षपदाला न्याय देऊ शकतील, असे वाटत नाही. अशा परिस्थतीत एखादा तिसरा पर्याय मिळाला तर तर तो निवडून येईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण ही द्विपक्षीय राजकीय पद्धतीच्या शेवटाची सुरुवात ठरू शकेल, असा विचार, हा नि:कर्ष समोर आल्यावर अनेकांच्या मनात येतो आहे. अनेकांच्या मनात क्लिंटन यांच्याविषयी इतका रोष आहे की, ट्रंप यांच्याबद्दल चांगले मत नसूनसुद्धा केवळ बदल हवा म्हणून ट्रंप यांना मत द्यावे, असे त्यांना वाटते आहे. अर्थात असा असंतोष केवळ हिलरींमुळेच आहे असे नाही. त्याला गेल्या आठ वषार्तील डेमोक्रॅट पक्षाची राजवटही कारणीभूत आहे. असे असले तरी मे महिन्यात दोन टक्के मतांनी ट्रंप यांनी मिळविलेली आघाडी भरून काढत क्लिंटन यांनी ट्रंप यांना १२ टक्याच्या फरकाने मागे टाकले आहे. पण याचे श्रेय क्लिंटन यांना द्यायचे की ट्रंप यांना या अपश्रेयाचे धनी मानायचे?
इतर पक्षांकडे कल वाढला - लिबर्टेरियन पार्टीच्या गॅरी जॉनसन यांना ७(सात) टक्के मतदार पाठिंबा देत आहेत तर ग्रीन पार्टीच्या श्रीमती जिल स्टीन यांना ३ (तीन) टक्के मते मिळाली आहेत. या दोन उमेदवारांनी १0 टक्के मते घेतली आहेत. याचा अर्थ असा की हा ट्रंप व क्लिंटन यांच्या मतांमध्ये पडलेला फरक वा दिसणारी बढत ९० चे दोन भाग होऊन पडलेली आहे. २0१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत इतर सर्व उमेदवारांना मिळालेली मते जेमतेम २(दोन) टक्के होती. २0१६ मध्ये हे दोनच उमेदवार एकूण १0 टक्के मते घेताना आजच दिसत आहेत. यात आणखी वाढ झाली तर काय? ही बाब या दोन्ही पक्षांना विचार करावयास लावणारी आहे.
असे होणार मतदान - अगोदर थोडी पार्श्‍वभूमी लक्षात घेऊ या. अमेरिकन संसदेची दोन सभागृहे आहेत. एक हाऊस (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज ) व दुसरे सिनेट. हाऊसमध्ये प्रत्येक राज्याला त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व असते. जसे कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य आहे. त्याला हाऊसमध्ये ५३ प्रतिनिधी असतात. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. १९११ सालची लोकसंख्या गृहीत धरून केलेल्या हिशोबानुसार प्रत्येक राज्याची हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या ठरवण्यात आली असून सध्या हाऊसची सदस्य संख्या ४३५ इतकी आहे.
सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला दोन सिनेटर्स मिळतात. मग ते राज्य लहान असो वा मोठे. अमेरिकेत आजमितीला ५0 राज्ये आहेत. त्यामुळे ५0 ला दोनने गुणून येणारी संख्या १00 ही सिनेटमधील सिनेटर्सची संख्या असते. अशाप्रकारे जोपयर्ंत राज्यांची संख्या ५0 आहे तोपयर्ंत सिनेटर्सची संख्या १00 व राज्याच्या लोकसंख्येचा विचार करण्यासाठी १९११ सालची त्या त्या राज्याची संख्या हिशोबात घ्यायची हा निकष जोपयर्ंत कायम आहे , तोपयर्यंत हाऊसमधील प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या ४३५ कायम राहील.
इलेक्टोरल कॉलेज - यात एकूण ५३८ सदस्य असतात. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याची प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक सिनेटर्सची संख्या असा तो नियम आहे. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर लहानातलहान राज्याच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्याने ४३५+१00=५३५ ही संख्या येत असताना इलेक्टर्स ५३८ कसे? विशेष कारणास्तव नेब्रास्का व मेन या दोन राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. अशाप्रकारे ज्या उमेदवाराला २७0 मते(इलेक्टर्स) मिळतील तो उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
पक्ष इलेक्टर्ससाठी उमेदवार कसे निवडतात? - प्रत्येक राज्याची इलेक्टर्ससाठी उमेदवार निवडण्याची पद्धत वेगळी असते. यांचे नामनिर्देशन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात करतात. पक्षाचे अनुभवी व एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाचे राज्य पदाधिकारी, अध्यक्षीय उमेदवार वा पक्षाशी जवळीक असलेल्या व्यक्ती यातून राज्यनिहाय इलेक्टर्स निवडले जातात. जसे कॅलिफोर्नियातून ५५ उमेदवारांची यादी प्रत्येक पक्ष तयार करील. अध्यक्षीय उमेदवारांच्या नावाखाली यांची नावे असतात किंवा नसतात.
विनर टेक्स ऑल- २0१२ मध्ये कॅलिफोर्नियात सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व रॉम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात.मतांच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी होत नाही. या नियमाला विनर टेक्स ऑल असे म्हणून संबोधतात.या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते. कॅलिफोर्नियाप्रमाणे फ्लोरिडा (२७+२=२९), न्यूयॉर्क(२७+२=२९), टेक्सास(३६+२=३८) ही सुद्धा मोठी राज्ये आहेत. ही सुद्धा कुणतरी एकाकडे (क्लिंटन किंवा ट्रंप) जातील. अशाप्रकारे ज्याच्याकडे २७0 इलेक्टर्स जातील तो निवडून येईल. कारण २७0 इलेक्टर्सची २७0 मते त्या उमेदवाराला मिळणार, हे उघड आहे. पण कुणालाच २७0 इलेक्टर्स म्हणजेच त्यांची २७0 मते मिळाली नाहीत तर काय होईल? हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ४३५ प्रतिनिधींची तातडीची बैठक होईल व ते अध्यक्ष निवडतील. तसेच सिनेटचे सदस्य उपाध्यक्ष निवडतील. अध्यक्षीय निवडणुकीत सामान्य मतदारही मतदान करीत असतात. यांच्या मतांला पॉप्युलर व्होट असे म्हणतात. समजा, एका उमेदवाराला ५0 टक्यापेक्षा जास्त पॉप्युलर व्होट्स मिळाली. पण दुसर्‍या उमेदवाराला इलेक्टोरल व्होट्स ५0 टक्यापेक्षा जास्त मिळाली, तर कोण निवडून येईल? इलेक्टोरल व्होट्स ज्याला जास्त आहेत, तो. सामान्यत: ज्याला इलेक्टोरल व्होट्स त्यालाच पॉप्युलर व्होट्सही जास्तच मिळतात, पण आजवर चारदा अपवाद घडला आहे. १८२४, १८७६, १८८८ व अलीकडचे उदाहरण म्हणजे २000 अशी ही अपवादात्मक वर्षे आहेत. २000 साली डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार अल गोर यांना ४८.३८ टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाली तर त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी जॉर्ज बुश यांना ४७.८७ टक्केच मते मिळाली. म्हणजे पॉप्युलर व्होट्समध्ये अल गोर आघाडीवर होते. पण जॉर्ज बुश यांना २७१ इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती तर अल २६६ च इलेक्टोरल व्होट्स मिळाले होती. त्यामुळे जॉर्ज बुश यांना इलेक्टोरल व्होट्समधील आघाडीमुळे विजयी घोषित करण्यात आले. एक काल्पनिक उदाहरण घेऊ. - समजा ८ नोव्हेंबर २0१६ मध्ये कुणालाच २७0 इलेक्टोरल व्होट्सचा जादुई आकडा गाठता नाही, तर काय? म्हणजेच कुणालाच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळाले नाहीत तर काय? अशा परिस्थितीत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे ४३५ सदस्य अध्यक्षाची निवड करतील. ८ नोव्हेंबर २0१६ लाच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज ची निवडणूक होतेच आहे. हे सदस्य अध्यक्षाची व सिनेट उपाध्यक्षाची निवड करील. ही परिस्थिती उद्भवली तर तो द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाचा आरंभ मानला जाईल.

Comments

Popular posts from this blog

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम