एक सर्वेक्षण


एक सर्वेक्षण
सध्या अमेरिकेत जे मतसर्वेक्षण होते आहे, त्यानुसार रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंप डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांची बरोबरी करतांना तर कधी त्यांना मागे टाकतांना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वी अशी शक्यताही कोणालाही वाटत नव्हती.
रिपब्लिकन पक्षाच्या पक्षांतर्गत प्रायमरीजमध्ये सुद्धा प्रादेशिक अस्मिता, इतर देशांच्या नागरिकांना अमेरिकेत नोकरीनिमित्त प्रवेश करण्यास अनुमती, अमेरिकेत गोऱ्यांवर होणारे हल्ले यांचे भांडवल करून डोनाल्ड ट्रंप सर्व प्रसार माध्यमांमध्ये झळकत राहिले.
पण ८ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीवर या सर्वांचा परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण फ्लोरिडा; अमेरिकेचा अप्पर साऊथइस्ट रीजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाॅर्थ कॅरोलीना, साऊथ कॅरोलीना, टेनसी, व व्हर्जिनिया या ४(चार) राज्यात;  रस्ट बेल्ट  रीजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  इलिनाॅइस, इंडियाना, मिशिगन, ओहिओ व पेन्सिलव्हॅनिया ५(पाच) राज्यात आणि इंटिरिअर वेस्ट रीजन  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅरिझोना, कोलोराडो, इडाहो, माॅंटॅना, नेवाडा, न्यू मेक्सिको,  युटाह, व्योमिंग या ८(आठ)  अशा एकूण १८ राज्यात कोण बाजी मारतो, यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते असे मानले जाते. या १८ राज्यात १९९२ पासून २०१२ पर्यंत डेमोक्रॅट पक्षाची चलती चालत आलेली असून या राज्यातून डेमोक्रॅट पक्ष तब्बल २४२ इलेक्टोरल व्होट्सची भरभक्कम पायाभरणी सतत करीत आलेला आहे. निवडणूक जिंकायला २७० इलेक्टोरियल व्होट्स लागतात, हे लक्षात घेतले म्हणजे खूप बोलबाला झालेले बोलभांड ट्रंप यांच्यासमोर किती मोठे आव्हान आहे, ते लक्षात येईल. पण अजून ८ नोव्हेंबर ही तारीख तशी खूप दूर आहे.
  प्रत्येक पक्षाचे बाले किल्ले असतात. तसे या दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले आहेत. त्यात दर निवडणुकीत थोडीफार  पडझड होत असते इतकेच. यांचा उल्लेख सेफ स्टेट्स किंवा नाॅन स्विंग स्टेट्स अशा नावाने केला जातो. याउलट जी राज्ये कोणत्या पक्षाच्या बाजूने उभी राहतील, हे अनिश्चित असते, त्यांना स्विंग स्टेट्स किंवा पर्पल स्टेट्स किंवा बॅटल ग्राऊंड स्टेट्स म्हणून संबोधतात. २०१६ मध्ये ओहिओ, कोलोरॅडो, आयोवा, नेवाडा, न्यू हॅंपशायर, व्हर्जिनिया आणि फ्लोरिडा ही स्वंग स्टेट्स असतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेत लोकमत कोणत्या कारणाने कुणाकडे झुकेल, ते सांगता येत नाही. मुस्लिमांबाबतची भूमिका हा जसा एक ज्वलंत प्रश्न आहे, तसाच लिंग परिवर्तन झालेल्या व्यक्तींनी कोणती बाथ रूम वापरावी, याबाबतही टोकाची मते बाळगणारे आहे.

Comments

Popular posts from this blog

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम