अमेरिकेतल अध्यक्षपदाची निवडणूक

अमेरिकेतल अध्यक्षपदाची  निवडणूक
     २०१६ च्या अखेरीला अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात एकमेकांवर टीका एकमेकांची टिंगलटवाळी आतापासूनच सुरू झाली आहे.
      असाच एक विनोद सध्या व्हायरल झाला आहे. एका शाळेत वर्गात शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात,
     'अध्यक्ष ओबामा कुणाकुणाला आवडतात?'.
 एक मुलगा वगळता वर्गातील सर्व मुले हात वर करतात.
     'तुला ओबामा का आवडत नाहीत?'.शिक्षक विचारतात.
     ' कारण माझे वडील रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. माझी आई सुद्धा रिपब्लिकन आहे. म्हणून मी सुद्धा रिपब्लिकन आहे. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य असलेले ओबामा आवडत नाहीत'. मुलगा उत्तर देतो.
     ' तुझे वडील मूर्ख असते, आईही मूर्ख असती तर तूही मूर्ख झाला असतास का?', शिक्षकाने मुलाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
     ' नाही, मी डेमोक्रॅट झालो असतो', मुलाने शिक्षकावरच बाजू उलटवली.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे स्वरूप
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे स्वरूप वेगळे आहे. तिचे स्वरूप ढोबळमानाने असे सांगता येईल. प्रथम पक्ष स्तरावर गावपातळी पासून देश पातळीपर्यंत प्रतिनिधींची निवड पक्ष सदस्य करतात. मग देश पातळीवर पक्षाचे अधिवेशन होते. त्या ठिकाणी निवडणुकीने अध्यक्षपदाचा प्रत्येक पक्षाचा उमेदवार ठरतो. पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची  ही अशी काहीशी पद्धत आहे.
    रिपब्लिकन पक्षात आज वीस संभाव्य उमेदवार आहेत. सामान्यत: यांच्यात आपापसात लढत होऊन शेवटी देशपातळीवरच्या अध्यक्षपदासाठी ( बहुदा दोनच) दोन इच्छुक उरतील. यातून पक्ष अध्यक्षपदाचा आपला उमेदवार निश्चित करील. गाव पातळीपासून क्रमाने पुढे जात देश पातळीवरचे प्रतिनिधी निवडण्यासाठी  प्रत्येक पक्षात पक्षांर्गत निवडणुकी सुरू झाल्या आहेत. आपल्याच पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 'पत्ता कट करण्यासाठी' हालचाली व डावपेच सुरू झाले आहेत.
    डेमोक्रॅट पक्षातही अशीच पद्धत असणार. पण त्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरल्यातच जमा आहे. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी असलेल्या पण कर्तृत्वाने तेवढ्याच किंवा काकणभर सरस असलेल्या हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार असतील.
      पक्ष फक्त अध्यक्षपदाचाच उमेदवार निश्चित करीत नाही तर उपाध्यक्षपदाचा उमेदवारही निश्चित करतो. निवडणुकीत मतदार या जोडीला मतदान करतात. एका जोडीतला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि दुसय्रा जोडीतला उपाध्यक्षपदाचा उमेदवार असे मतदान करण्याची मुभा मतदारांना नसते.
    अध्यक्षपदाच्या मतपत्रिकेत प्रत्येक पक्षाची जोडगोळीची (अध्यक्षपदाचा उमेदवार आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार) नावे असतात. रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे दोनच मुख्य पक्ष असले तरी दोनचार चिल्लर पक्षही असतात. यातील एकही जोडी पसंत नसेल तर मतदार आपल्या पसंतीची जोडी मतपत्रिकेत आपल्या हस्ताक्षरात नोंदवू शकतो. अर्थात ही किंवा अशी जोडी निवडून येण्याची शक्यता नसते. पण मतदाराला हे स्वातंत्र्य आहे.

Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी